राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई - १ हजाराहून अधिक गुन्हे दाखल
१८ ते २३ नोव्हेंबर - पुण्यातील मद्य विक्रीसाठी ड्राय डे घोषित
पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. १ ऑक्टोबर २०२४ पासून या विभागाने १ हजार २६७ गुन्हे नोंदवले असून, १ हजार १७९ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ९८२ वाहनांसह ५ कोटी ५५ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली आहे.
मद्य वाहतुकीविरुद्ध कठोर कारवाई
महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत पुणे जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांविरुद्ध ५९ प्रस्ताव संबंधित दंडाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले आहेत. या इसमांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेतले जात आहे. आतापर्यंत १२ प्रकरणांमध्ये एकूण ११ कोटी ८० हजार रुपये इतक्या रकमेचे बंधपत्र घेण्यात आले आहे. याच काळात गोवा राज्य निर्मित मद्याचे तीन गुन्हे उघडकीस आले असून, यात ४१ लाख ७७ हजार ३०५ रुपयांचा मुद्देमाल दोन वाहनांसह जप्त करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी विशेष पथकांची स्थापना
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, तसेच राज्य उत्पादन शुल्कच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार १ ऑक्टोबरपासून विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांकडून जिल्ह्यात हातभट्टी, अवैध ताडी व्यवसाय, मद्य वाहतूक आणि विक्रीच्या ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात येत आहे.
अनुज्ञप्तींच्या सखोल तपासणीसाठी विशेष मोहिम
जिल्ह्यातील अनुज्ञप्तीधारकांच्या सखोल तपासणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जात आहे. निवडणुकीच्या काळात मद्य विक्रीच्या वेळाविषयी काटेकोरपणे पालन केले जात आहे, तसेच अल्पवयीनांना मद्य विक्री होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
ड्राय डे जाहीर - १८ ते २० नोव्हेंबर आणि २३ नोव्हेंबर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १८ नोव्हेंबरपासून २० नोव्हेंबरपर्यंत आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यात ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. या काळात सर्व मद्य विक्री बंद राहणार आहे. मद्याशी संबंधित कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य आढळल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवता येईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी केले आहे.
Reviewed by ANN news network
on
११/१७/२०२४ ०८:१४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: