सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी रविवारी जिल्ह्यातील सीमावर्ती चेकपोस्ट आणि स्थिर सर्वेक्षण पथकांची (एसएसटी) अचानक तपासणी केली.
दोन राज्यांच्या सीमेवर असलेल्या जिल्ह्यात विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देत, सर्व चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी वेंगुर्ला तालुक्यातील सोन्सुरे येथील मतदान केंद्राची पाहणी केल्यानंतर मठ चेकपोस्ट, तेरेखोल-गोवा बॉर्डर चेकपोस्ट, आरोंदा-किरणपाणी चेकपोस्ट, सातार्डा आणि बांदा चेकपोस्टला भेटी दिल्या.
२० नोव्हेंबरला होणाऱ्या तिन्ही विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुका निर्भयपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख मार्ग, शहरी प्रवेशद्वारे आणि आंतरराज्य सीमावर्ती भागात स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत.
पाटील यांनी प्रत्येक चेकपोस्टवरील कामकाजाची माहिती घेतली आणि वाहन नोंदवह्यांची तपासणी करून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या.
Reviewed by ANN news network
on
११/०५/२०२४ ०८:२९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: