"मुनगंटीवार यांच्या विजयाने चंद्रपूरचा विकास तिप्पट वेगाने होईल - गडकरी"
दुर्गापूर - मतपेढीचे आणि जातीय राजकारण करणाऱ्यांना दूर लोटून महायुतीला कौल द्यावा, असे आवाहन केंद्रीय वाहतूक आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले. बल्लारपूर मतदारसंघातील भाजप-महायुती उमेदवार व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
"देशाला आत्मनिर्भर आणि जगातील तिसरी महासत्ता बनवण्यासाठी, तसेच राज्य व चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीशिवाय दुसरा पर्याय नाही," असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
२०१४ पूर्वी एकही किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग नसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आज डबल इंजिन सरकारच्या काळात ४७४ किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग तयार झाला आहे. शिवाय, ५ हजार कोटींची नवी महामार्ग बांधणीची कामेही मंजूर झाली आहेत.
बल्लारपूर येथे मिथेनॉल आणि अमोनियम नायट्रेट निर्मिती प्रकल्प होणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली. बांबूपासून मिथेनॉल आणि बायो एव्हिएशन इंधन निर्मितीमुळे शेतकरी आता केवळ अन्नदाता नव्हे, तर ऊर्जादाता आणि इंधनदाता बनला आहे.
पर्यटन क्षेत्रातील प्रगतीचा उल्लेख करताना ताडोबा व्याघ्र प्रकल्प जागतिक स्तरावर पर्यटन केंद्र बनल्याचे गडकरी यांनी सांगितले. प्रदूषण कमी करण्यासाठी ताडोबा जंगलात लवकरच इलेक्ट्रिक वाहने धावणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
या प्रसंगी ज्येष्ठ नेते चंदन सिंह चंदेल, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
Reviewed by ANN news network
on
११/१३/२०२४ ०४:२८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: