वॉशिंग्टन : अमेरिकेच्या २०२४ च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचा पराभव करत ट्रम्प यांनी पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश केला आहे.
अमेरिकन मीडियाच्या
अंदाजानुसार, पेन्सिल्व्हेनिया, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना आणि विस्कॉन्सिन या महत्त्वाच्या
स्विंग राज्यांमध्ये ट्रम्प यांनी विजय मिळवला. तसेच ॲरिझोना, नेवाडा आणि मिशिगन या
तीन राज्यांमध्येही त्यांनी आघाडी कायम राखली.
"हा एक भव्य विजय
आहे. मी अमेरिकन जनतेचा विश्वासघात करणार नाही," असे विजयानंतर ट्रम्प यांनी म्हटले
आहे. एक शतकाहून अधिक काळानंतर नॉन-कन्सेक्युटिव्ह टर्म जिंकणारे ते पहिले राष्ट्राध्यक्ष
ठरले आहेत. तसेच, निवडून आलेले ते सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्षीय उमेदवार ठरले आहेत.
या निवडणुकीत झालेल्या
मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप येणे बाकी असली तरी, प्रमुख मीडिया संस्थांनी ट्रम्प
यांच्या विजयाची घोषणा केली आहे. पुढील काही तासांत सविस्तर निकाल जाहीर होणे अपेक्षित
आहे.
भारत-अमेरिका संबंधांच्या नव्या अध्यायाची सुरुवात होण्याची अपेक्षा
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर भारत-अमेरिका संबंधांमध्ये नवा अध्याय सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जगातील सर्वात जुन्या लोकशाही (अमेरिका) आणि सर्वात मोठ्या लोकशाही (भारत) देशांमधील संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध जगजाहीर आहेत. सप्टेंबर २०१९ मधील 'हाउडी मोदी' कार्यक्रम असो की फेब्रुवारी २०२० मधील 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रम, दोन्ही नेत्यांमधील सौहार्दपूर्ण संबंध स्पष्टपणे दिसून आले.
ट्रम्प यांनी अनेकदा सार्वजनिकरित्या पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली आहे. १० ऑक्टोबरच्या भेटीत त्यांनी मोदींना 'चांगला माणूस' असे संबोधले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: