वाशीम : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला जागतिक स्तरावर श्रेष्ठत्व मिळवून देण्याच्या संकल्पात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे," असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
वाशीम मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्याम खोडे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि वीर सावरकर यांच्या स्मरणाने त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
योगी म्हणाले, "विधानसभा निवडणुकीत एका बाजूला मोदींच्या नेतृत्वाखालील महायुती, तर दुसरीकडे राष्ट्रभावना नसलेले महाअनाडी गठबंधन आहे." त्यांनी महाविकास आघाडीच्या धोरणांवर टीका करताना, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून दिली.
अयोध्येतील राममंदिर निर्मितीचा उल्लेख करत त्यांनी "काशी आणि मथुरेकडे कूच करण्याची" घोषणा केली. औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावर झाल्याचे त्यांनी कौतुक केले.
"नव्या भारतात चीनचे सैन्य पिछेहाट करताना दिसत आहे. मोदी सरकार देशाच्या १४० कोटी जनतेच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी कटिबद्ध आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि जनता उपस्थित होती. महायुतीचे स्थानिक नेते आणि कार्यकर्तेही व्यासपीठावर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: