चिंचवड : चिंचवड मतदारसंघात महिलांची मतदारसंख्या लक्षणीय असून, या निवडणुकीत महिला मतदार विकासासाठी काम करणारे उमेदवार राहुल कलाटे यांना मत देतील, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचार कार्यालयाला भेट देऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारांसोबत संवाद साधला.
सुळे यांच्या भेटीच्या वेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. महिला आरोग्य, सुरक्षितता, आणि इतर मूलभूत सुविधांबाबत सत्ताधाऱ्यांनी विशेष काही केलेले नाही, असे मत महिला कार्यकर्त्यांनी मांडले. यावेळी सोसायटीधारकांनी पाणी, वीज, रस्ते अशा समस्यांसंदर्भात आपल्या अडचणी सुळे यांच्यासमोर मांडल्या, ज्यावर त्यांनी महाविकास आघाडी सत्तेत आल्यास सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
"चिंचवडमध्ये आम्ही गेली १२ वर्षे राहतोय, पण शहराच्या वाढीसोबतच सुविधा सुधारल्या नाहीत. यावेळी आमचे आरोग्य, सुरक्षितता, आणि स्वावलंबन याला प्राधान्य देणाऱ्या राहुल दादांना मत देऊन परिवर्तन घडवणार आहोत."
- ज्योती निंबाळकर, महिला शहर अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस
"महिला मतदारांना विकासासंबंधी मुद्दे मांडताना महागाईचा प्रश्नदेखील प्रकर्षाने समोर येतो. महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत कॅन्सर जनजागृती अभियानासारखे उपक्रम राबवले आहेत."
- राहुल कलाटे, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (महाविकास आघाडी)
जयंत पाटील यांची आज सभा
महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज (ता. १२) संध्याकाळी पाच वाजता, विमल गार्डन, रहाटणी येथे सभा घेणार आहेत. जयंत पाटील चिंचवडमध्ये पहिल्यांदा येणार असल्याने सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Reviewed by ANN news network
on
११/१२/२०२४ १०:१४:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: