"चिखली न्यायालयाच्या स्वप्नपूर्तीसाठी वकील बांधवांचा शंकर जगताप यांना पाठींबा"
चिंचवड - पिंपरी चिंचवड शहरातील वकील समुदायाने महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे. स्व. लक्ष्मण जगताप यांनी न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी घातलेल्या पायावर पुढील वाटचाल करण्यासाठी शंकर जगताप यांचे नेतृत्व महत्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास वकील समुदायाने व्यक्त केला आहे.
पुनावळे येथे आयोजित स्नेह मेळाव्यात पिंपरी चिंचवड कायदा आघाडीचे शहराध्यक्ष ॲड. गोरखनाथ झोळ यांनी स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कार्याचा आढावा घेतला. चिखली येथे भव्य न्यायालय सुरू करण्याची प्रक्रिया, सेक्टर १४ येथील न्यायालय इमारतीसाठी १२४ कोटींचा निधी मिळवणे, नेहरूनगर न्यायालय इमारतीचे आधुनिकीकरण अशा महत्त्वपूर्ण कामांमध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते.
मेळाव्यास सुमारे ७०० वकील बंधू-भगिनी उपस्थित होते. यामध्ये भाजपचे प्रदेश कायदा सेलचे प्रभारी ॲड. धर्मेंद्र खांडरे, पुणे जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. अशोक संकपाळ यांच्यासह अनेक ज्येष्ठ विधिज्ञ उपस्थित होते.
"शंकर जगताप हे वकिलांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायहक्कांसाठी सतत सजग असतात. त्यांचा प्रशासकीय व संघटन कौशल्याचा अनुभव न्यायसंस्थेला नवी दिशा देण्यास उपयुक्त ठरेल," असा विश्वास ॲड. झोळ यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुधाकर आव्हाड यांनी संविधान बदलाच्या अफवांना "विरोधकांचा रडीचा डाव" असे संबोधले. "देशाचे संविधान कोणीही बदलू शकत नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे," असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. पल्लवी विघ्ने व ॲड. हर्षद नढे यांनी केले तर ॲड. पूनम राऊत यांनी आभार मानले.
Reviewed by ANN news network
on
११/१७/२०२४ ०५:४२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: