पुणे : महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियानामध्ये 'न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे' या शाळेने विभागीय पातळीवर अ व ब वर्ग महापालिका खासगी शाळा गटात प्रथम क्रमांक पटकावून एकवीस लाखांचे पारितोषिक मिळवले आहे. नागपूरच्या सरस्वती विद्यालयाला दुसरा तर पुण्याच्या श्री शिवाजी मराठा हायस्कूल शाळेला तिसरा क्रमांक मिळाला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता राव, पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार, शाला समिती अध्यक्ष खेमराज रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन या स्पर्धेसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न केले. या प्रयत्नांना या पुरस्काराच्या रूपाने यश आले.
न्यू इंग्लिश स्कूलची वैशिष्ट्ये:
• कृत्रिम तारांगण असलेली आशिया खंडातील एकमेव शाळा
• अवकाश निरीक्षणासाठी वेधशाळेची सोय
• ३७००० पुस्तकांचे भव्य ग्रंथालय
• इंग्रजी भाषा प्रयोगशाळा
• गणित खेळघर
• भव्य प्रयोगशाळा
• भव्य मैदान
• जगभरातील १२५ खनिजांचे भूवस्तूसंग्रहालय
• दुर्मीळ दिव्यांचे संग्रहालय
शाळेने राबवलेले काही महत्त्वपूर्ण उपक्रम:
१. ऐतिहासिक वारसा जपणे: व्याख्याने व क्षेत्रभेटींद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत ऐतिहासिक वारसा पोहोचवण्याचे कार्य केले जाते.
२. शेती उपक्रम: विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने दुधीभोपळा, दोडकी, वांगी, मिरच्या, कांदा व अळू यांचे उत्पादन परसबागेत घेतले आहे.
३. पर्यावरण संवर्धन: विद्यार्थी स्वत:च्या परिसरातील प्लास्टिक कचरा जमा करून इको ब्रिक्स तयार करतात. वृक्षारोपण व सीडबॉल तयार करणे हे उपक्रम राबवले जातात.
४. स्वच्छता अभियान: इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची स्वच्छता दूत म्हणून नेमणूक केली आहे. हे विद्यार्थी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतात व प्रात्यक्षिके करतात.
५. शैक्षणिक नवोपक्रम: शिक्षक स्वत:चे मोबाईल ॲप तयार करून त्यावर अध्यापन करतात. विविध शैक्षणिक साधने व उपक्रमांद्वारे अध्यापन केले जाते.
६. ICT प्रयोगशाळा: अद्ययावत ३१ संगणकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक संगणकज्ञानासाठी तयार केले जाते.
७. व्यवसाय मार्गदर्शन: सुतारकाम, शेती व्यवस्थापन, प्लंबिंग, केटरिंग, इलेक्ट्रिशियन असे व्यवसाय मार्गदर्शन वर्ग चालवले जातात.
८. क्रीडा विकास: विद्यार्थी योगासन व कराटे स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळवतात.
९. सांस्कृतिक कार्यक्रम: प्रख्यात व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जातात. चित्रकला, शिल्पकला, कथाकथन अशा स्पर्धा घेतल्या जातात.
१०. स्पर्धा परीक्षा: विविध शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये विद्यार्थी सहभागी होऊन यश मिळवतात.
विशेष उपक्रम:
शाळेचे आद्यसंस्थापक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून यावर्षी शाळेने संस्थापक सप्ताह आयोजित केला होता. यामध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला नोंद झालेल्या लोकमान्य टिळकांच्या प्रतिमांचे प्रदर्शन भरवण्यात आले. या काळात अनेक मान्यवरांनी शाळेस भेट दिली. विद्यार्थ्यांनी संस्थापकांच्या जीवनातून कोणता आदर्श घ्यावा, याबाबत हस्तलिखिते तयार केली आहेत.
न्यू इंग्लिश स्कूलने भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत योगदान दिले आहे. शाळा सामान्य घरांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना अत्यंत प्रामाणिकपणे आणि मनापासून शिक्षण देऊन, त्यांचा सर्वांगीण विकास करून, समाजामध्ये, विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवून समाजाची सेवा करण्यासाठी चांगले नागरिक घडवते. शाळेच्या या प्रयत्नांना महाराष्ट्र शासनाकडून मिळालेली ही शाबासकीची थाप आहे.
Reviewed by ANN news network
on
१०/१३/२०२४ ०४:०६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: