महाभोंडला कार्यक्रमात कथ्थक, रासगरबा, गोंधळी, पारंपारिक नृत्यांचे सादरीकरण
सांगवी : लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार यांच्या वतीने विजयादशमीनिमित्त आयोजित करण्यात आलेला महिलांसाठी महाभोंडला व रावणदहन सोहळा पिंपळे गुरव, सांगवी आणि पिंपरी चिंचवड शहरातील लाखो नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि जल्लोषात संपन्न झाला. सुमारे १ लाखांहून अधिक नागरिकांच्या साक्षीने अहंकाराचे प्रतीक असलेल्या रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
सांगवी येथील पीडब्लूडी ग्राउंडवर शनिवारी (दि. १२ ऑक्टोबर) सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत हा सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी माता आणि स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच उद्योगमहर्षी, पद्मविभूषण स्व. रतन टाटा यांनाही आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महाभोंडला कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शालिनीताई ग्रुप, परंपरा ग्रुप, अनुभूती ग्रुपच्या महिलांनी गोंधळी नृत्यातून मंगळागौरीचा जागर केला. तर डोनेटेड सोसायटी ग्रुप, नवदुर्गा महिला मंडळ ग्रुप, राधाकृष्ण ग्रुप, वृंदावन ग्रुपच्या महिलांनी रासगरबा नृत्याचे सादरीकरण केले. मयूर डान्स अकॅडमीच्या मानसी भागवत यांनी 'रामयणा'वर आधारित कथ्थक नृत्य सादर केले तर 'दम दमा दम' रिऍलिटी शोचे विजेते नृत्य कलाकारांनी तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित नृत्य सादर केले.
या कार्यक्रमासाठी 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' चित्रपटात शंभूराजांची भूमिका साकारणारे अनुप सिंग ठाकूर, दिग्दर्शक दादा पाटील, व सहकलाकार श्रद्धा शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी चित्रपटाच्या ट्रेलरला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
युट्युबवरील 'चांडाळ चौकटीच्या करामती' वेबसिरीजच्या कलाकारांनी सादर केलेल्या 'ग्रामपंचायतीच्या ग्रामसभे'च्या विनोदी नाट्याने उपस्थितांचे मनोरंजन केले.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शंकर जगताप यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "आज येथे जमलेली गर्दी ही आमच्या जगताप कुटुंबावर असलेल्या प्रेमाची पोचपावती आहे. तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही याची मी ग्वाही देतो."
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत हरहरे यांनी भाषणात पुढील विधानसभा निवडणुकीसाठी हिंदुत्ववादी उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी ७० फुटी रावणाचे दहन करण्यात आले आणि उपस्थितांनी 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या.
कार्यक्रमाला विधानपरिषद आमदार उमाताई खापरे, अमित गोरखे, माजी महापौर उषा ढोरे, भाजपा पदाधिकारी आणि पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख नेते उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
१०/१३/२०२४ ०८:१४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: