उरण : उरण तालुक्यातील प्रसिद्ध ॐ श्री साईराम पदयात्रा मंडळाने २४व्या वार्षिक उरण ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन केले आहे. ही पदयात्रा रविवार, १३ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून सोमवार, २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत चालणार आहे. साईभक्त आणि पदयात्रेचे सदस्य आज उरण येथून शिर्डीकडे रवाना झाले. साईबाबांचे नामस्मरण करत, भक्तिगीते गात पदयात्री २१ ऑक्टोबर रोजी शिर्डीत पोहोचणार आहेत.
यावेळी २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ ते १० वाजेपर्यंत श्री साई भंडाराचे आयोजन श्री साई मंदिर, अंबिकावाडी, नागाव येथे करण्यात आले आहे. दररोज पहाटे ४ वाजता श्रींच्या चरण पादुकांचे पूजन, पालखी पूजन, आणि काकड आरती होणार आहे. दुपारी १२ वाजता मध्यान्ह आरती, श्री साई चरित्राचा पारायण, तर दुपारी ३ वाजता ॐ श्री साईनाथाय नमः मंत्राचा जप होईल. संध्याकाळी ६:३० वाजता धूप आरती आणि नंतर भजन, कीर्तन, भारूड, प्रवचन होईल.
उरण तालुक्यात साईबाबांचे अनेक भक्त असून, विविध साई मंदिरे आहेत जिथे नियमित पूजा, आरती, भजन आयोजित केले जातात. गेल्या २३ वर्षांपासून श्री साई मंदिर अंबिकावाडीचे ट्रस्टी जनार्दन घरत यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ ही पदयात्रा आयोजित करत आहे.
या पदयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष संदीप ठाकूर (नागाव), उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील (नागाव), सचिव विजय घरत (अंबिकावाडी), उपसचिव गणेश पाटील (उरण कोटनाका), आणि खजिनदार हिम्मत पाटील (केगाव दांडा) विशेष प्रयत्न करत आहेत. भजन प्रमुख कपिल म्हात्रे, पालखी प्रमुख उमेश भोईर (कोटनाका), खानपान प्रमुख छाया म्हात्रे (न्हावा), आणि महिला हरिपाठ मंडळ प्रमुख प्रमिला घरत (अंबिकावाडी) यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे व्यवस्थापन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: