उरण : उरण तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी लाल बावटा बांधकाम कामगार संघटना रायगडच्या प्रयत्नांमुळे चारफाटा, उरण येथे गृहोपयोगी भांडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रायगड जिल्हा बांधकाम कामगार मंडळाच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला गेला.
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कामगारांच्या नोंदणीसाठी संघटनेच्या वतीने प्रयत्न करण्यात आले. कामगारांचे आवश्यक कागदपत्रे जमा करून, अनेक बिगारी, मिस्त्री, गवंडी, सुतार, रंग कामगार, वायरमन आणि नाका कामगारांना बांधकाम मंडळात नोंदणीकृत करण्यात आले. नोंदणीकृत कामगारांना विविध लाभ मिळणार आहेत. यामध्ये दिवाळी बोनस म्हणून ५,००० रुपये, शैक्षणिक भत्ता १ लीपासून पदवीधर मुलांसाठी २,५०० रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंत, वैद्यकीय अपघातामध्ये मृत झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये मदत, अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांपर्यंतची मदत आणि मातृत्व काळात तसेच लग्नासाठी आर्थिक सहाय्य या सुविधांचा समावेश आहे.
या उपक्रमाचे नेतृत्व लाल बावटा बांधकाम कामगार रायगडचे अध्यक्ष कॉ. जयवंत तांडेल यांनी केले, ज्यांनी कामगारांच्या नोंदणीसाठी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमात आई इन्फ्रास्ट्रक्चरचे नरसु पाटील यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले, तर कामगार नेते कॉ. भूषण पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या भांडी वाटप उपक्रमामुळे उरण परिसरातील बांधकाम कामगारांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: