उरणमध्ये शिवसेना-भाजप युतीत दरी; बालदी यांच्या उमेदवारीला विरोध



भाजपच्या एकतर्फी निर्णयाला शिवसेनेचा विरोध; उरणमध्ये राजकीय वातावरण तापले

उरण  - उरण विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने (भाजप) शिवसेना (शिंदे गट) ला विश्वासात न घेता महेश बालदी यांची उमेदवारी जाहीर केल्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. रविवारी झालेल्या पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना जिल्हा प्रमुख अतुलशेठ भगत यांनी बालदी यांच्या उमेदवारीला जाहीर विरोध करत निवडणुकीत त्यांचे काम करणार नसल्याचे स्पष्ट केले.

रत्नेश्वरी मंदिर सभागृह, जसखार येथे आयोजित मेळाव्यात बोलताना भगत म्हणाले, "उरण विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची चांगली पकड असून, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीरंग बारणे यांना ३०,००० अधिक मते मिळाली आहेत. येथे ४०,००० हून अधिक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे."

"भाजपने स्थानिक भूमिपुत्राऐवजी बालदी यांना उमेदवारी दिल्याने आम्ही नाराज आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना उरण विधानसभा मतदारसंघात बालदी यांचे काम करणार नाही," असे भगत यांनी स्पष्ट केले.

या मेळाव्यास खालापूर विभाग प्रमुख निवेदिता कोंडीलकर, उरण तालुका प्रमुख प्रणाली म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येने तरुण आणि महिलांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

तालुका संपर्क प्रमुख दिपक ठाकूर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन रायगड जिल्ह्यातील महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आणि भरत गोगावले यांना मताधिक्य मिळवून देण्याचे आवाहन केले.

शिवसेनेच्या या निर्णयामुळे महायुतीचे उमेदवार महेश बालदी यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उरणमध्ये शिवसेना-भाजप युतीत दरी; बालदी यांच्या उमेदवारीला विरोध उरणमध्ये शिवसेना-भाजप युतीत दरी; बालदी यांच्या उमेदवारीला विरोध Reviewed by ANN news network on १०/२९/२०२४ १२:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".