पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) आरोग्य विभागात २२० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक आरोप रयत विद्यार्थी परिषदेने केला आहे. या प्रकरणी प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या संघटनेने अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) धाव घेतली आहे.
रस्ते आणि गटार सफाईच्या निविदा प्रक्रियेत ८ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हा कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. "आम्ही पुरावे सादर करूनही महापालिका आयुक्त डोळेझाक करत आहेत. हे घोटाळा दडपण्याचाच प्रयत्न आहे," असा गंभीर आरोप रयत विद्यार्थी परिषदेच्या प्रतिनिधींनी केला.
ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, एफआयआर आणि चार्जशीटची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने संघटना संतापली आहे. "प्रशासन जर आता जागे झाले नाही, तर आम्ही थेट पोलिसांकडे जाऊ," असा इशारा संघटनेने दिला आहे.
या प्रकरणात स्थायी समिती सभापती, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सखोल चौकशीची मागणी जोर धरत असताना, महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, "आरोपांची दखल घेतली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल."
या घोटाळ्याच्या वार्तेने शहरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, स्थानिक नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
पीसीएमसीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, प्रशासन या आव्हानाला कसे तोंड देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचे पडसाद राज्य पातळीवरही उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Reviewed by ANN news network
on
१०/१२/२०२४ ०४:५९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: