पुणे: श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टने यंदाच्या नवरात्रोत्सवाचे भव्य आयोजन केले आहे. ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत साजरा होणाऱ्या या उत्सवात अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
गुरुवार, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता मंदिर व्यवस्थापक श्री देवेंद्र देवदत्त अनगळ यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. या वेळी श्री श्रीराम नारायण कानडे गुरूजी नवचंडी होम करणार आहेत. उत्सवाच्या काळात मंदिर २४ तास भाविकांसाठी खुले राहणार असून, दररोज सकाळी १० व रात्री ९ वाजता महाआरतीचे आयोजन केले आहे.
नवरात्रोत्सवात दररोज गणपती मंदिरात भजन, कीर्तन व प्रवचनांचे कार्यक्रम होणार आहेत. मुख्य मंदिरात श्रीसुक्त, ललितासहस्त्रनाम, महिषासुर मर्दिनी स्तोत्र व वेदपठण यांसारखे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दसऱ्याच्या दिवशी सकाळी ८.३० वाजता नवचंडी होम होणार असून, सायंकाळी ५ वाजता देवीची पालखी सिमोल्लंघनासाठी निघणार आहे.
मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून, सध्या ४०% काम पूर्ण झाले आहे. नवीन सभामंडप जुन्यापेक्षा दुप्पट मोठा असणार आहे. एका भाविकाने देवीला ३ लाख रुपये किंमतीची सोने व मोत्यांची नथ अर्पण करण्याचा संकल्प केला आहे.
उत्सवादरम्यान भाविकांच्या सोयीसाठी विविध स्टॉल्स, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सेवा, पार्किंग व्यवस्था यांची सोय करण्यात आली आहे. भाविकांसाठी ऑनलाइन दर्शन पासची सोय www.chatushrungidevi.com वर उपलब्ध आहे.
मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री अमित अनगळ यांनी सर्व भाविकांना उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. "यंदाचा नवरात्रोत्सव अधिक भव्य व दिव्य होणार आहे. सर्व भाविकांनी या उत्सवात सहभागी होऊन माँ चतुःशृंगीचे आशीर्वाद घ्यावेत," असे आवाहन त्यांनी केले आहे.
Reviewed by ANN news network
on
९/२८/२०२४ ०८:००:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: