पिंपरी : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात महाविकास आघाडी आणि सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने येत्या ९ सप्टेंबर २०२४ रोजी 'भीक मांगो' आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा १०० फुटी पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळ्याच्या कामात मोठ्या प्रमाणात अनागोंदी आणि भ्रष्टाचार होत असल्याचे महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटनांनी उघड केले आहे. पुतळा उभारणीचे काम सुरू असताना संभाजी महाराजांच्या 'मोजडी'ला तडे गेल्याचे निदर्शनास आले, ज्यामुळे या कामाच्या गुणवत्तेबद्दल शंका निर्माण झाली आहे. यामुळे शहराच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचेही बोलले जात आहे.
या सत्ताधाऱ्यांच्या मस्तवाल कारभाराचा निषेध करण्यासाठी आणि असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून महाविकास आघाडी व सामाजिक संघटनांच्या वतीने ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता 'भीक मांगो' आंदोलन करण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या आंदोलनाची सुरुवात होईल. पिंपरी चौकातून राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढला जाईल, आणि नंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गेटवर धरणे आंदोलन करण्यात येईल, असे मानव कांबळे यांनी सांगितले.
या आंदोलनात अधिकाधिक नागरिक तसेच शिव-शंभू प्रेमी संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही कांबळे यांनी केले आहे.
Reviewed by ANN news network
on
९/०६/२०२४ ०८:३५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: