पिंपरी : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरातचे माजी गृहमंत्री आणि प्रवासी प्रभारी नेता प्रदीपसिंग जडेजा यांनी आज पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभांचा आढावा घेतला. पक्षाच्या विकासकामांची माहिती, बूथ रचना, आणि मतदार नोंदणी यावर चर्चा करून तिन्ही विधानसभा निहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी शहर भाजप अध्यक्ष शंकर जगताप यांनी श्री. जडेजा यांचे स्वागत केले.
यावेळी, शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, आमदार उमा खापरे, समन्वयक राम गावडे आणि इतर अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. श्री. जडेजा यांच्यावर महाराष्ट्रातील मावळ, पिंपरी, चिंचवड, भोसरी, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, खेड या ८ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील बैठका घेतल्या.
शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात भाजपला मोठा लीड मिळाला होता. आगामी निवडणुकांतही भाजप आणि महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्री. जडेजा यांनी पक्षाच्या बुथ रचनेसह मतदार नोंदणीवर जोर दिला. तसेच, महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना," मोफत गॅस सिलेंडर आणि मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याच्या योजनांचा उल्लेख करून, या योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचावा असे त्यांनी सांगितले. विरोधकांच्या फेक नरेटिव्हला योग्य उत्तर देण्याचेही त्यांनी पदाधिकाऱ्यांना निर्देश दिले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: