अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील एका उपशिक्षकाला ४०,००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई खालापूर तालुक्यातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर फाट्याजवळ करण्यात आली.
आरोपी उपशिक्षकाची ओळख श्री. अमित राजेश पंडया (४७) अशी आहे. ते सध्या रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. याआधी ते पनवेल तालुक्यातील जाताडे प्राथमिक शाळेत उपशिक्षक होते.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार शिक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे जून आणि जुलै २०२४ चे वेतन मंजूर करण्यासाठी श्री. पंडया यांनी ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केली.
४ सप्टेंबर रोजी एसीबीने सापळा रचला होता, परंतु श्री. पंडया यांना संशय आल्याने त्यांनी त्यावेळी पैसे स्वीकारले नाहीत. त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी पुन्हा सापळा रचण्यात आला. दुपारी ५:४५ वाजता श्री. पंडया यांनी तक्रारदाराकडून ४० हजार रुपये स्वीकारले आणि त्याच वेळी त्यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सुनील लोखंडे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Reviewed by ANN news network
on
९/२३/२०२४ ०८:१५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: