बीडमधील ज्ञानराधा पतसंस्था घोटाळ्यातील दोन प्रमुख आरोपी गजाआड!: ३५१५ कोटींचा गैरव्यवहार!! फरार व्हाईस चेअरमन व संचालक अटकेत
पिंपरी: बीड जिल्ह्यातील बहुचर्चित ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी घोटाळ्यात महत्त्वाची प्रगती झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी व सोसायटीचे व्हाईस चेअरमन यशवंत वसंतराव कुलकर्णी (वय ५५) आणि त्यांचे पुत्र व संचालक वैभव यशवंत कुलकर्णी (वय २४) यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
३ हजार ५१५ कोटी रुपयांच्या या भव्य आर्थिक घोटाळ्यात कुटे ग्रुपच्या ज्ञानराधा सोसायटीच्या ५२ शाखांमधील सुमारे ४ लाख ५० हजार ठेवीदारांची फसवणूक झाली होती. या प्रकरणी आरोपींविरुद्ध एकूण ४२ गुन्हे नोंदवण्यात आले असून, दोघेही बराच काळ फरार होते.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाने ही कारवाई केली. पथकातील पोलीस हवालदार गणेश गिरी गोसावी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी पिता-पुत्र वाकड येथील फिनिक्स मॉलमध्ये येणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
पकडल्यानंतर प्राथमिक चौकशी करून दोघा आरोपींना पुढील कारवाईसाठी बीड शहर पोलीस उपअधीक्षकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, मुख्य आरोपी यशवंत कुलकर्णी यांना पकडून देणाऱ्यास रोख बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अमर राऊत, पोलीस अंमलदार गणेश गिरीगोसावी, सुनिल कानगुडे, किरण काटकर, किशोर कांबळे, भुपेंद्र चौधरी, प्रदीप गायकवाड या पथकाने केली.
या घोटाळ्याने महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. ठेवीदारांचे करोडो रुपये बुडाल्याने अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, आणखी काही महत्त्वाच्या अटकांची शक्यता वर्तवली जात आहे.
बीड पोलिसांकडे आरोपींचा ताबा गेल्यानंतर त्यांच्याकडून अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. ठेवीदारांचे पैसे कोठे गेले, घोटाळ्यात आणखी कोण सहभागी होते, याबाबत तपास यंत्रणा बारकाईने माहिती गोळा करत आहे. या प्रकरणाचा पुढील तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: