पुणे : जेवल्यानंतर उलटी झाली या क्षुल्लक कारणावरून नाशिक येथे एका ४ वर्षांच्या बालकाला त्याच्या आईच्या प्रियकराने बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध पडल्यानंतर त्याला मृतावस्थेत पुण्यात आणून तो बेशुद्ध असल्याचे भासवत हा गंभीर गुन्हा लपविण्याचा प्रयत्न करणार्या आईचा बनाव बिबवेवाडी पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे उघडकीस आला.
वेदांश विरभद्र काळे (वय ४, रा. राजीव गांधीनगर, अप्पर बिबवेवाडी) असे मृत बालकाचे नाव आहे त्याची आई पल्लवी विरभद्र काळे (वय २४) हिचे महेश कुंभार याच्याशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे ती वेदांशसह महेश याच्याकडे नाशिक येथे रहात होती १ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जेवल्यानंतर वेदांश याला उलटी झाली. त्यामुळे संतापलेल्या महेश कुंभार याने त्याला हाताने आणि झाडूने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेला वेदांश बेशुद्ध पडला. त्याला नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेले. त्यानंतर त्याला पल्लवी हिने मृतावस्थेत पुण्यात आणले. आणि, तो बेशुद्ध असल्याचे भासवत त्याला उपचारासाठी कमला नेहरू रुग्णालयात नेले. त्याच्या हाताला असलेल्या प्लॅस्टरबाबत तो लोणावळा येथे टेरेसवरून पडल्याने हात मोडला आहे तसेच आता तो कॉटवरून पडल्याने बेशुद्ध झाला आहे असे खोटे सांगून त्याच्या आईने डॉक्टरांना चकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. शवविच्छेदनात अनेक जखमांमुळे वेदांशचा मृत्यू झाल्याचे पुढे आले.
पोलिसांनी पल्लवी हिच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर तिने आपल्या आणि आपल्या प्रियकराच्या कुकृत्याची कबुली दिली.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव यांनी सरकारतर्फे बिबवेवाडी पोलीसठाण्यात तक्रार नोंदविली. ही तक्रार नाशिक पंचवटी पोलीसठाण्याकडे वर्ग करण्यात आली. तेथील पोलिसांनी महेश कुंभारला अटक केली.
ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक मंगल मोढवे, निरीक्षक मनोजकुमार लोंढे, उपनिरीक्षक शशांक जाधव, अशोक येवले, विवेक सिसाळ, अंमलदार विजय लाड,अंकुश केंगले, नितीन धोत्रे, विशाल जाधव, संजय आंग्रे, अजय कामठे व आदिती बहिरट यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: