नाशिक (सातपूर):एका भंगारवाल्या सह त्याच्या भावाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत २० हजार रुपये लाच मागणार्या सातपूर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई अनंता बळवंत महाले (ब. नं. २१०३) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देणार्याचे सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भंगार दुकान आहे. तक्रारदाराचे भावाला काही कारण न सांगता पोलिसांनी चौकशीसाठी नेले होते. त्यानंतर, पोलीस शिपाई अनंता महाले यांनी तक्रारदाराला फोन करून धमकावले की, "तुला आणि तुझ्या भावाला एखाद्या गुन्ह्यात अडकवून अटक करू शकतो. जर तुम्हाला तुमच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ नये असे वाटत असेल, तर २५ हजार रुपये द्यावे लागतील," असे सांगत त्यांनी लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने लगेचच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. पडताळणी दरम्यान, अनंता महाले यांनी तडजोडीअंती २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
यावरून, अनंता महाले यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा क्रमांक २०९/२०२४ दि. २२ ऑगस्ट २०२४ रोजी सातपूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: