निगडी येथील शाळेतील प्रकार
निगडी: निगडी येथील किर्ती विद्यालयातील एका मास्तरने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यासह आठ जणांना अटक केली आहे. यामध्ये शाळेचा हेडमास्तर आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
प्रमुख आरोपी निवृत्ती देवराम काळभोर हा किर्ती विद्यालयाचा शिक्षक असून त्याने गेल्या दोन वर्षांपासून पीडित मुलीला वारंवार लैंगिक त्रास दिल्याचे समोर आले आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पॉक्सो) आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आठ जणांमध्ये निवृत्ती काळभोर (मास्तर), अशोक जाधव (हेडमास्तर), रोहिदास बलभिम जाधव (संस्थेचा अध्यक्ष), लक्ष्मण नामदेव हेंद्रे, अविंद्र अंकुश निकम, गोरख सोपान जाधव, हनुमंत दादा निकम आणि शुभांगी अशोक जाधव यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, आरोपी निवृत्ती काळभोर याच्याविरुद्ध २०१८ मध्येही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता आणि न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली होती. त्यानंतरही शाळा व्यवस्थापनाने त्याला पुन्हा नोकरी दिल्याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त डॉ. महावरकर आणि उपआयुक्त स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त पाटील हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
या घटनेमुळे शैक्षणिक संस्थांमधील मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तींना पुन्हा नोकरी देण्याच्या प्रवृत्तीवर टीका होत आहे.
Reviewed by ANN news network
on
८/२४/२०२४ ०४:५९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: