विठ्ठल ममताबादे
उरण : जे एन पी टी मार्गावरील न्हावा शेवा कस्टम कार्यालयाजवळ बुधवारी पहाटे भरधाव ट्रेलर आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात एक व्यक्ती ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत ठाकूर (केळवणे), सचीन म्हात्रे आणि आकाश चौगुले (दोघेही भोम) हे तिघे रात्रपाळी संपवून रिक्षाने घरी परतत असताना हा अपघात घडला. समोरून येणाऱ्या ट्रेलरने रिक्षाला जोरदार धडक दिली, ज्यात भरत ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला. सचीन म्हात्रे आणि आकाश चौगुले हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष अनिकेत वसंत तांडेल यांनी या घटनेची माहिती न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे पीएसआय दीपक दाभाडे यांना दिली. जखमींना प्रथम जेएनपीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारांसाठी वाशीच्या एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले.
उरण परिसरात गेल्या काही वर्षांत अनेक उड्डाणपूल बांधण्यात आले असले तरी ट्रेलरच्या बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. दास्तान ते दिघोडे चिरनेर मार्ग आणि खोपटा ते उरण रस्त्यावरही अपघातांचे सातत्य कायम आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
पोलीस अधिक तपास करत असून ट्रेलर चालकाविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
उरणमध्ये भीषण अपघात; एक ठार, दोघे जखमी
Reviewed by ANN news network
on
८/०७/२०२४ ०८:५०:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
८/०७/२०२४ ०८:५०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: