पिंपरी-चिंचवड : मुंबई-बंगळूर महामार्गावरील वाकड ते किवळे दरम्यानच्या सर्व्हिस रोडची अवस्था पावसामुळे बिकट झाली असून, नागरिक व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी प्रत्यक्ष पाहणी केली.
माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधल्यानंतर, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता प्रमोद ओमबासे व ज्ञानदेव झुंझारे, कार्यकारी अभियंता संध्या वाघ व देवण्णा गट्टेवार, तसेच उपअभियंता बिआरटी साळी व रवींद्र सूर्यवंशी यांनी सर्व्हिस रोडची पाहणी केली.
अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खराब झालेल्या रस्त्याची पाहणी केली आणि समस्यांचे विश्लेषण केले. या दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपाययोजनांवर चर्चा झाली. रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यासंबंधी संवाद साधण्यात आला.
सध्या खराब रस्त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, परिणामी वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले, "आम्ही रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. लवकरात लवकर दुरुस्तीचे काम हाती घेऊन नागरिकांची गैरसोय दूर करण्यात येईल."
राहुल कलाटे यांनी या समस्येकडे लक्ष वेधल्याबद्दल त्यांचे आभार मानले जात असून, रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Reviewed by ANN news network
on
८/०७/२०२४ ०९:००:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: