उरण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोसळण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाने आज उरणमध्ये जोरदार आंदोलन केले. माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
गेल्या वर्षी ४ डिसेंबर रोजी उभारण्यात आलेला शिवरायांचा हा पूर्णाकृती पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी अचानक कोसळला. या घटनेने शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. ३६०० कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या पुतळ्याच्या कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
उरण शहरातील विमला तलाव येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आयोजित या निषेध आंदोलनात शिवसैनिकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते या आंदोलनात सहभागी झाले होते.
या वेळी उपस्थित असलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, जयवंत पाटील, उपतालुका संघटक रुपेश पाटील, अमित भगत, उपशहरप्रमुख कैलास पाटील यांचा समावेश होता. तसेच महिला आघाडी, युवासेना आणि अल्पसंख्यांक सेलचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलकांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवरायांच्या स्मृतीचा अवमान करणाऱ्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: