अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जोरदार स्पर्धा चालू आहे. ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतली असतानाच काल पेनसिल्व्हानिया प्रांतात एका जाहीर सभेच्यावेळी ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला. हल्लेखोरांनी झाडलेली एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. त्यात ते जखमी झाले. पण ते सुदैवाने बचावले. जीवावरचे संकट कानावर निभावले. या घटनेचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील अनेक नेत्यांनी निषेध केला. या धक्कादायक प्रकारामुळे ट्रम्प यांच्याविषयी अमेरिकन नागरिकात मोठी सहानुभूती निर्माण झाली आहे. आणि लोकशाही आणि सुरक्षा व्यवस्था यांचा टेंभा मिरवणार्या अमेरिकन प्रशासनावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
जी अमेरिका इतर देशातील राजकीय अस्थीरता, हिंसाचार या विषयी नेहमी टीकाटिपण्णी करत असते त्या अमेरिकेत हा प्रकार घडल्यामुळे अमेरिकेची मोठी पंचाईत झाली आहे.
भारतीय वंशाच्या देशद्रोही, खलिस्थानवादी पन्नूच्या कथित हत्येच्या कटासंदर्भात बोलताना अमेरिकेच्या प्रवक्त्याने आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा महत्वाची असल्याचे म्हटले होते. आणि आता प्रत्यक्षात त्या देशात माजी राष्ट्राध्यक्षही सुरक्षित नाहीत हे आता दिसून आले आहे.
काहीही असो या घटनेनंतर जखमी झालेले असताना ट्रम्प यांनी काही क्षणातच स्वतःला सावरत मूठ उंचावून उपस्थित समुदायाकडे पहात 'फाईट' 'फाईट'असे म्हटले. त्यांचे हे मनोधैर्य आता त्यांना विजयाकडे नेणार अशी चिन्हे आहेत. त्यांच्या या कृतीमुळे ट्रम्पसमर्थकात उत्साहाची लाट आली आहे. एलॉन मस्क याने तर आपल्या ट्विटमध्ये प्रेसिडेंट ट्रम्प असा उल्लेख करून ट्रम्प यांचा विजय निश्चित असल्याचे जणू अधोरेखित केले आहे.
ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचे काही धक्कादायक तपशील पुढे आले आहेत. प्रचारादरम्यान अतिरिक्त सुरक्षा मिळावी अशी मागणी सरकारकडे ट्रम्प यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र ती मान्य झाली नाही अशी माहिती आहे. शिवाय या सभेदरम्यान एका उंच ठिकाणी ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी स्नायपर्स तैनात होते. त्यांच्या समोरच केवळ सुमारे ४०० फूट अंतरावर असलेल्या एका इमारतीच्या छपरावरून हल्लेखोराने गोळ्या झाडल्या. त्यानंतर अवघ्या ४५ सेकंदाच्या आत स्नायपर्सनी त्याचा खात्मा केला. मात्र, सभेसाठी आलेल्या एका नागरिकाने प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आपण हल्लेखोराला बंदुकीसह इमारतीवर चढताना पाहिले आणि ही बाब सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आणून दिल्याचा दावा केला आहे. जर हे खरे असेल तर सुरक्षायंत्रणा त्याची खातरजमा करून हल्लेखोराला हल्ल्याअगोदरच ताब्यात घेऊ शकत असताना तसे का केले गेले नाही असा प्रश्न निर्माण होतो. हल्लेखोराचा हा हल्ला करण्यामागे नेमका काय हेतू होता हे अद्याप समजलेले नाही. त्याने एआर १५ ही अॅसॉल्ट रायफल या हल्ल्यासाठी वापरली पहिल्यांदा ३ आणि नंतर ५ गोळ्या झाडल्या असे दिसून आले आहे. या रायफलचा गोळी झाडल्यानंतर बसणारा झटका मोठा असतो. त्यामुळे प्रत्येक गोळीनंतर निशाणा किंचित बदलतो असे सांगितले जाते. कदाचित त्यामुळेच ट्रम्प बचावले असावेत.
काहीही असो या हल्ल्यानंतर क्षणात सावरलेले ट्रंप सध्या अमेरिकेत हिरो बनले आहेत. आणि, पन्नूसारख्या भारतद्रोही व्यक्तीवर हल्ला करण्याच्या कटाची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हान यांना भारतात पाठवून एका सामान्य नागरिकाच्या सुरक्षिततेची काळजी असल्याचे दाखविणारे अमेरिकन प्रशासन या प्रकारामुळे उघडे पडले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: