नाशिकरोड कारागृहातील घटना
नाशिक : तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी ३० हजार रुपयांची घेणार्या तुरुंगाच्या दोन डॉक्टरांना अॅन्टीकरप्शन खात्याच्या पथकाने 'रंगेहाथ' पकडले. नाशिकरोड तुरुंगात १४ जुलै रोजी ही घटना घडली.
डॉ. आबिद आबू अत्तार (४०), डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार (४२) अशी या डॉक्टरांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात मुंबईनाका पोलीसठाणे, नाशिक येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी एका व्यक्तीने अॅन्टीकरप्शन खात्याच्या नाशिक कार्यालयाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराचा मित्र नाशिकरोड तुरुंगात शिक्षा भोगत आहे, शासकीय नियमाप्रमाणे ज्या कैद्याचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त आहे व त्याने १४ वर्षे शिक्षा भोगली आहे. अशा कैद्यांना शासनाने नेमलेली समिती सोडून देते. त्यासाठी तुरुंगाच्या मुख्य वैद्यकिय अधिकार्याने दिलेल्या प्रमाणपत्राची गरज असते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी या दोन्ही डॉक्टरांनी तक्रारदाराकडे चाळीस हजार रुपये लाच मागितली. तडजोडीअंती तीस हजार रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानंतर तक्रारदाराने अॅन्टीकरप्शनच्या नाशिक कार्यालयाकडे तक्रार केली. अॅन्टीकरप्शनच्या अधिकार्यांनी १४ जुलै रोजी सापळा रचून दोन्ही डॉक्टरांना लाच स्वीकारताना 'रंगेहाथ' पकडले.
अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक स्वप्नील राजपूत ,राजेंद्र सानप, हवालदार प्रभाकर गवळी,प्रफुल्ल माळी, संतोष गांगुर्डे, किरण धुळे यांनी ही कारवाई केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: