पुणे : पुण्यातील म्हाडा कार्यालयात कंत्राटी प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करणार्या तरुणाला २ लाख ७० हजार रुपयांची लाच घेताना पुणे अॅन्टीकरप्शनच्या अधिकार्यांनी ३१ मे रोजी सायंकाळी रंगेहाथ पकडले. अॅन्टीकरप्शनच्या अधिकार्यांनी पडताळणी केली असता या व्यवस्थापकाने म्हाडाच्या मुख्याधिकार्यासाठी २ लाख २० हजार आणि स्वतःसाठी ५० हजार अशी २ लाख ७० हजार रुपयांची लाच मागितली असल्याचे दिसून आल्याने म्हाडाच्या मुख्याधिकार्यावरही कारवाईची शक्यता आहे.
अभिजीत व्यंकटराव जिचकार(वय-34 रा. वाकड) असे अटक करण्यात आलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. एका ६० वर्षांच्या वृद्धाने या प्रकरणी अॅन्टीकरप्शनकडे तक्रार केली होती. त्यांना म्हाडाच्या सोडतीमध्ये घर मिळाले होते. घराच्या सोडतीच्यावेळी अधिक रक्कम भरावी लागेल याची माहिती दिली नसल्यामुळे त्यांना घराचा वाढीव हप्ता भरता आला नाही. त्यामुळे त्यांना मिळालेल्या सदनिकेचे पुनर्वितरण होण्यासाठी तकारदार यांनी म्हाडाकडे अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर विचार करून त्यांना पैसे भरण्यासाठी आरटीजीएस चलन देण्याकरिता अभिजित जिचकार याने त्यांच्याकडे लाच मागितली.
त्या वृद्धाने अॅन्टीकरप्शनकडे तक्रार केली. त्यानंतर अॅन्टीकरप्शनच्या पथकाने पडताळणी केली. जिचकार याने लाच घेऊन तक्रारदार यांना ३१ मे रोजी सायंकाळी पुण्यातील साधू वासवानी चौकात असलेल्या स्टेटस फॅमिली रेस्टॉरंट अँड बारमध्ये बोलावले. तेथे लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.या प्रकरणी बंडगार्डन पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे अॅन्टीकरप्शनच्या पथकाने केली. पुढील तपास निरीक्षक वीरनाथ माने करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: