पुणे : रेल्वेच्या पुणे विभागात मे २०२४ मध्ये फुकटे प्रवासी आणि सामान वाहतूक करणारे यांच्याकडून २ कोटी ४८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही माहिती रेल्वेचे पुणे येथील जनसंपर्काधिकारी रामपाल बडपग्गा यांनी दिली.
मे महिन्यात पुणे विभागात २४ हजार ५११ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळले. त्यांच्याकडून १ कोटी ९६ लाख रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले.८ हजार ४७४ प्रवासी अनियमीत प्रवास करताना तिकीट तपासनिसांच्या हाती गवसले. त्यांच्याकडून ५१ लाख ८ हजार रुपये वसूल करण्यात आले. तर, सामानाचे शुल्क न भरता घेऊन जाणार्या १६७ प्रवाशांकडून ३५ हजार २९५ रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले.
ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इन्दू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.
रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा अशी विनंती रेल्वेतर्फे करण्यात आली आहे. विनातिकीट प्रवास केल्यास रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो असेही रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: