ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून ‘निर्मलवारी’ पूर्वतयारीचा आढावा

 


स्वच्छ, निर्मल व सुरक्षित वारीसाठी आवश्यक नियोजन करा-गिरीष महाजन

पुणे : पालखी सोहळ्यात  वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासह स्वच्छ, निर्मल व सुरक्षित वारीसाठी बारकाईने नियोजन करा, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित निर्मलवारी पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपायुक्त समीक्षा चंद्राकार,  वर्षा लड्डा-उंटवाल, विजय मुळीक, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, तसेच सातारा, सोलापूर, नाशिक व जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी (दुरदृश्य प्रणालीद्वारे) उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, यावर्षी पालखी सोहळ्यासाठी  गतवर्षीपेक्षा अधिकचा निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. पालखी सोहळ्यासाठीची कामे पारदर्शकता ठेऊन वेळेत पूर्ण करावीत. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी, पालखी मार्ग व विसावा स्थानांवर स्वच्छता राखली जाईल याची विशेष खबरदारी घ्यावी. स्वच्छतेसाठी पुरेशा प्रमाणात फिरती शौचालये आणि अधिक प्रमाणात स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. पंढरपूर येथे पालखी तळावर पुरेशा प्रमाणात आणि मोठ्या आकाराच्या कचराकुंड्या ठेवाव्यात.

निर्मलवारीच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक जिल्ह्यातील स्वयंसेवक, सेवाभावी संस्था, एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्याबाबत आवाहन करावे. पंढरपूर शहरातील वीज पुरवठा अखंडित राहील याची दक्षता घ्यावी.  पिण्याच्या पाण्याचा स्रोतांच्या ठिकाणी आवश्यक असल्यास जनरेटरची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. पावसाच्या पार्श्वभूमीवर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी चांगली व्यवस्था होईल याकडे लक्ष द्यावे. 

टँकरमधील पाण्याच्या शुद्धतेबाबत नियमित तपासणी करावी. पाण्याच्या स्रोतांचे शुद्धीकरणही निटपणे होईल याकडे लक्ष देण्यासोबत त्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करावी. जळगाव जिल्हा परिषदेने संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यासोबत दोन पिण्याच्या पाण्याचे टँकर पंढरपूरपर्यंत उपलब्ध करुन द्यावेत. पालखी मार्गावरील रेस्टॉरंट, हॉटेल्स यांची स्वच्छता व अन्न शुद्धतेची खात्री करावी. तसेच पंढरपूर हरातील कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी वाढीव मनुष्यबळ व वाहनांची व्यवस्था करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. पालखी सोहळ्यादरम्यान पिण्याचे पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीदेखील श्री.महाजन यांनी दिली.

प्रधान सचिव डवले यांनी निधी उपलब्धतेबाबत माहिती दिली. पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या कामांचे कार्यादेश तातडीने देऊन कामे सुरू करावीत. पालखी सोहळ्यासंबंधातील कामे वेळेवर पूर्ण होतील यादृष्टीने नियोजन करावे, असे ते म्हणाले.

विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावर्षी फिरते शौचालय आणि स्वच्छतेसाठी मनुष्यबळ अधिक संख्येने वाढवण्यात आले आहेत. स्वच्छ आणि निर्मल वारीसाठी विशेष नियोजन करण्यात आले असून पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी, प्रथमोपचार पेट्या, निवारा केंद्र, हिरकणी कक्ष आदी सुविधांसोबत वारकऱ्यांना आरोग्य सुविधा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे, सातारा,सोलापूर, नाशिक व जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. 

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून ‘निर्मलवारी’ पूर्वतयारीचा आढावा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून ‘निर्मलवारी’  पूर्वतयारीचा आढावा Reviewed by ANN news network on ६/१९/२०२४ ०४:०३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".