मुंबई : शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाची भूमिका मांडली आहे. त्यांचा असा दावा आहे की, जर भाजपाचा खासदार लोकसभा अध्यक्षपदावर विराजमान झाला, तर महाराष्ट्र विधानसभेतील अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश डावलून राजकीय पक्षांची फोडाफोड करण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. राऊत यांनी सांगितले की, भाजपाच्या खासदाराने अध्यक्षपद घेतल्यास नितीशकुमार यांच्या जेडीयू आणि एन. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षामध्ये फूट पाडली जाऊ शकते.
इंडिया आघाडीची योजना
तेलगू देसम पक्षाच्या उमेदवाराला समर्थन
राऊत यांनी सांगितले की, तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) लोकसभा अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार दिल्यास, इंडिया आघाडी त्याला निवडून आणण्यासाठी नक्कीच चर्चा करेल. तसेच, कायद्याने उपाध्यक्षपद विरोधकांनाच मिळाले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपाची फोडाफोड रणनीती
संजय राऊत यांनी दावा केला की, भाजपाने एनडीएतील पक्षांमध्ये फोडाफोड करण्याची परंपरा आहे. चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभेचे अध्यक्षपद मागितले आहे आणि जर हे पद एनडीएला मिळाले नाही, तर ते उमेदवार उभे करतील. त्यांनी असेही नमूद केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीडीपीमध्ये फूट पाडू शकतात. नितीश कुमार, चिराग पासवान, जयंत चौधरी यांच्या पक्षातही भाजपाची फोडाफोडी होऊ शकते.
सरकार पडण्याची शक्यता
राऊत म्हणाले, "लोकसभेत आता २०१४ आणि २०१९ सारखी परिस्थिती नाही. राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे आम्ही कधीही सरकार पाडू शकतो. एनडीएचे सरकार स्थिर नाही. आमच्या मनात आले तर आम्ही आमचे बहुमत संसदेत सिद्ध करू शकतो."
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका
आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बंद दाराआड चर्चा केली, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली नाही. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, "देशातील लोकशाही आणि संविधान वाचविण्याची भूमिका संघाला घ्यावी लागेल. मागच्या दहा वर्षात देशाचे जे नुकसान झाले, त्यात संघाचाही सहभाग होता. जर संघ आता स्वतःची चूक दुरुस्त करत असेल तर ही चांगली बाब आहे."

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: