नवी दिल्ली : नवी दिल्लीत काल ५ जून रोजी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत एनडीएच्या सदस्यांनी नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून निवड केली. त्यानंतर आता मोदी ८ जून रोजी तिसर्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त आहे.
या शपथविधीसाठी जगभरातील नेत्यांना आमंत्रण देण्यात आले असल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार एनडीएच्या 'नेबरहुड फर्स्ट' धोरणास अनुसरून श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड', भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्यासह काही आघाडीच्या दक्षिण आशियाई नेत्यांना मोदींच्या शपथविधी समारंभासाठी आमंत्रित केले आहे.
विक्रमसिंघे आणि हसीना यांचे मोदींशी फोनवर संभाषण झाले. त्यानंतर यांनी शपथविधीला उपस्थित राहणार असल्याचे म्हटले आहे.
श्रीलंकेच्या राष्ट्रपती कार्यालयाच्या मीडिया विभागाने सांगितले की, मोदींनी त्यांना शपथविधी समारंभासाठी आमंत्रित केले आणि विक्रमसिंघे यांनी ते निमंत्रण स्वीकारले आणि फोनवर मोदींचे विजयाबद्दल अभिनंदन केले.
मोदींनी हसीना यांच्याशी फोनवर संभाषण केले आणि त्यांना त्यांच्या शपथविधी समारंभात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले, जे त्यांनी स्वीकारले, असे राजनैतिक सूत्रांनी सांगितले. मोदींनी प्रचंड यांच्याशी स्वतंत्र फोनवर संभाषणही केले आहे.
आज सर्व नेत्यांना औपचारिक निमंत्रणे पाठवली जात असल्याची माहिती आहे.
या लोकसभा निवडणुकीत एनडीएने २९३ जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेण्यास सज्ज झाले आहेत. या पूर्वी अशी संधी पंडित जवाहरलाल नेहरू यांना मिळाली होती.
निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळू शकले नसले तरी पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीला ५४३ पैकी २९३ जागा मिळाल्या. लोकसभेच्या सभागृहात बहुमताचा आकडा २७२ आहे.
मोदींच्या पहिल्या नेत्रदीपक विजयानंतर प्रादेशिक गट सार्क (साउथ एशियन असोसिएशन फॉर रीजनल को-ऑपरेशन) देशांचे नेते शपथविधी समारंभाला उपस्थित होते.२०१९ मध्ये मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या शपथविधी सोहळ्याला बिम्स्टेक देशांचे नेते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: