२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील निगडी पोलीसठाण्याच्या पथकाने तब्बल ९० गुन्हे दाखल असलेल्या एका अट्टल घरफोड्यासह त्याने चोरीचा माल विकलेल्या सोनाराला बेड्या ठोकण्यात यश मिळविले आहे. या दोघांकडून २५ लाख ३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विकीसिंग जालींदरसिंग कल्याणी रा. रामटेकडी हडपसर असे अटक करण्यात आलेल्या घरफोड्याचे नाव असून अब्दुल्ला ताहीरबक्ष शेख वय ५८ वर्षे, पोरवाल रोड, धानोरी असे सोनाराचे नाव आहे.
२४ मे रोजी रात्री निगडी प्राधिकरणातील श्रीलक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडून आतील तिजोरी फोडत चोरट्यांनी ३० तोळे सोन्याचे दागिने, १० किलो चांदी, रोख १८ हजार रुपये व तेथील डिव्हीआर लांबवला होता. या प्रकरणी निगडी पोलीसठाण्यात २७२/२०२४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ४५४,४५७, ३८०, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास करताना निगडी पोलिसांनी सुमारे २५० ते ३०० सीसीटीव्ही फुटेज तपासली. त्यानंतर हा गुन्हा आरोपी विकीसिंग कल्याणी याने केला असल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस आले. हा आरोपी कायम सशस्त्र असतो आणि त्याने यापूर्वी पोलिसांवर गोळीबार केला आहे अशीही माहिती पोलीस पथकाला मिळाली. पोलिसांनी आरोपी रहात असलेल्या रामटेकडी परिसरात सतत ३ दिवस पाळत ठेवून आरोपी ३० मे रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास घरी आला असता त्याला शिताफीने अटक केली. त्याच्याकडे तपास केला असता त्याने निगडीतील श्रीलक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान फोडल्याची तसेच बिबवेवाडी येथील एक बंद फ्लॅट फोडल्याची आणि डोंबिवली येथून एक कार चोरल्याची कबुली दिली.
निगडीतील श्रीलक्ष्मी ज्वेलर्स फोडल्यानंतर त्याच्या वाट्याला आलेले दागिने त्याने सोनार अब्दुल्ला ताहीरबक्ष शेख याला विकल्याची कबुली दिली.त्याला अटक करून पोलिसांनी त्याच्याकडून १०० ग्रॅम सोन्याची लगड, ८ किलो ३०० ग्रॅम वजनाची चांदीची विट, गुन्हयात वापरलेली गाडी, घरफोडीचे साहित्य व दोन तलवारी असा एकुण २५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आरोपी विकीसिंग कल्याणी हा दाखलेबाज गुन्हेगार असून त्याच्यावर एकंदर ९० गुन्हे दाखल आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: