सिलीगुडी : पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात आज १७ जून रोजी सियालदहकडे जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने धडक दिल्याने पाच जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन पथकांसोबत बचावकार्य सुरू आहे.
दार्जिलिंग पोलिसांचे अतिरिक्त एसपी अभिषेक रॉय यांनी सांगितले की, "अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर २०-२५ जखमी झाले आहेत. परिस्थिती गंभीर आहे. मालगाडी कांचनजंगा एक्स्प्रेसला धडकल्याने ही घटना घडली."
कोलकात्याच्या सियालदह स्थानकाकडे जाणारी ही ट्रेन सिलीगुडीच्या रंगपाणी भागात मालगाडीने मागून धडक दिल्याने अपघात झाला. सूत्रांच्या मते, ट्रेनने सिग्नल ओव्हरशॉट केला असावा, ज्यामुळे टक्कर झाली.
उत्तर सीमारेल्वेच्या कटिहार विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी सांगितले की, आगरतळा येथून येणारी १३१७४ कांचनजंगा एक्स्प्रेस नवीन जलपाईगुडी स्थानकाजवळील रंगपाणीजवळ मालगाडीला धडकली.
उत्तर बंगालच्या न्यू जलपाईगुडी स्थानकापासून सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या रंगपाणी स्थानकाजवळ मालगाडीच्या लोकोमोटिव्हच्या पाठीमागून झालेल्या धडकेमुळे मागील दोन डबे रुळावरून घसरले, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघातावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, "एनएफआर झोनमध्ये हा दुर्दैवी अपघात आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे,एनडीआरएफ आणि एसडीआरएफ समन्वयाने काम करत आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत."
बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर शोक व्यक्त करताना पोस्ट केले की, "दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसिडवा भागात झालेल्या एका भीषण रेल्वे अपघाताबाबत आत्ताच कळून धक्का बसला. तपशीलांची प्रतीक्षा असताना, कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने धडक दिल्याचे वृत्त आहे. बचाव, पुनर्प्राप्ती, वैद्यकीय मदतीसाठी डीएम, एसपी, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. युद्धपातळीवर कारवाई सुरू केली आहे."
अपघाताच्या वृत्तांदरम्यान, रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. क्रमांक आहेत:
०३३-२३५०८७९४ आणि ०३३-२३८३३३२६.
कांचनजंगा एक्स्प्रेसने न्यू जलपाईगुडी स्थानकावरून सियालदहकडे प्रवास सुरू केल्यानंतर लगेचच ही टक्कर झाली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: