पोर्श कार प्रकरण : बाल न्याय मंडळाच्या सदस्यांची चौकशी होणार

 


पुणे : पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणात नवीन घडामोड घडली आहे. 'त्या' अल्पवयीन मुलाला ३०० शब्दांचा निबंध लिहिणे, १५ दिवस वाहतूक पोलिसाबरोबर वाहतुकीचे नियमन करणे आणि मानसोपचार घेणे अशी 'कठोर' शिक्षा देणार्‍या पुण्यातील बाल न्याय मंडळाचे सदस्य आता चौकशीच्या सापळ्यात अडकले आहेत. महिला आणि बाल न्याय मंडळाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी या सदस्यांच्या चौकशीचे आदेश दिले असून चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती एका आठवड्यात नारनवरे यांच्याकडे अहवाल सादर करणार आहे.

१८ मे रोजी रात्री अडीचच्या सुमारास कल्याणीनगर परिसरात ब्रह्मा बिल्डर्सचे विशाल अग्रवाल यांच्या १७ वर्षे ८ महिन्यांच्या 'अल्पवयीन' मुलाने पबमध्ये पार्टी केल्यानंतर पोर्श ही आलिशान गाडी भरवेगाने चालवून मोटारसायकलला धडक देऊन दोघांचा बळी घेतला होता. या प्रकरणात बाल न्याय मंडळाने त्याला पंधरा दिवस येरवडा ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभे राहून वाहतुकीचे नियोजन करावे, दारु सुटण्यासाठी मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावेत, अपघातावर त्याने ३०० शब्दाचा निबंध लिहावा, भविष्यात अपघात कोठेही अपघात झाल्याचे दिसल्यास मदत करावी असा आदेश देत त्याची जामिनावर सुटका केली होती. त्यानंतर फक्त पुणेच नव्हे तर संपूर्ण देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतः पुण्यात येऊन या प्रकरणात लक्ष घालावे लागले होते. त्यांनी झाडाझडती घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला. मात्र, बाल न्याय मंडळाच्या आदेशाविषयी जनतेत नाराजी असूनही याबाबतीत कोणतीही पावले उचलली गेली नव्हती. अखेरीस आता या प्रकरणी चौकशी केली जाणार आहे.  

पोर्श कार प्रकरण : बाल न्याय मंडळाच्या सदस्यांची चौकशी होणार पोर्श कार प्रकरण : बाल न्याय मंडळाच्या सदस्यांची चौकशी होणार Reviewed by ANN news network on ५/२९/२०२४ ०२:१८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".