आमदार धंगेकरांचे लक्ष पोर्श अपघात प्रकरणावरून विचलित व्हावे म्हणून विद्यापीठातील गांजा प्रकरणाला हवा देण्याचा प्रयत्न?
पोर्श अपघात प्रकरणातून अनेक प्रकरणांना जन्म!
पुणे : पुणे येथील कल्याणीनगर येथे १८ मे रोजी झालेल्या पोर्श कार अपघाताचे प्रकरण वेगवेगळी वळणे घेत पुढे सरकत आहे. मूळ आख्यानातून अनेक उपाख्याने बाहेर पडावीत तशी या प्रकरणातून दररोज नवी प्रकरणे चर्चेत येत आहेत. यामुळे प्रशासन आणि त्या प्रकरणातील दोषींना वाचवू पाहणारे यांची मोठी अडचण झाली असून आमदार रविंद्र धंगेकर आणि इतरांचे या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी विद्यापीठातील गांजा प्रकरणाला हवा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा पुणेकरांमध्ये सुरू झाली आहे.
काल या प्रकरणात नव्याने काही घडामोडी घडल्या. अपघात करणार्या मुलाचा रक्ततपासणी अहवाल बदलल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना दोन दिवसांपूर्वी बेड्या ठोकल्या. यामुळे हादरलेल्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यखात्याने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक तीन सदस्यांची समिती नेमली. या समितीच्या अध्यक्ष जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे आहेत. तर जे.जे. रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. गजानन चव्हाण आणि छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अति विशेषोपचार रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांचा सदस्य म्हणून या समितीत समावेश आहे.
समितीच्या अध्यक्ष डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर शिंदेसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांनी सापळे या मिरज येथील रुग्णालयात कार्यरत असताना त्यांनी तेथे आर्थिक गैरव्यवहार केल्याचे तसेच रक्तदात्यांनी दान केलेला प्लाझ्मा विकल्याचे तसेच एक रुग्णवाहिका १३ लाखांना खरेदी करून ती आपल्या आईच्या नावे रुग्णालयाला दान केल्याचे दाखविले असे गंभीर आरोप केले आहेत.
अशा परिस्थितीत काल २८ मे रोजी ही समिती पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल झाली. त्यावेळी माध्यमांनी डॉ. सापळे यांना हा प्रश्न विचारला असता त्यांनी माझी नियुक्ती शासनाने केली आहे. त्यांनाच विचारा असे म्हटले.
दरम्यान या प्रकरणात डॉ. अजय तावरे याच्यासाठी तीन लाख रुपयांची लाच देण्यात आल्याची चर्चा असून रक्तचाचणी विभागातील या प्रकरणाशी संबंधित एक कर्मचारी सध्या गायब झाला असून त्याचा मोबाईलही 'नॉट रिचेबल' येत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान या प्रकरणामुळे पुण्यातील दोन पब्ज चे परवाने रद्द करण्यात आले असून अनेक पब्ज, बार यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्या अपघात घडविणार्या पोर्शमध्ये एका आमदाराचा मुलगाही होता असा गौप्यस्फोट करत या बाबतीत चौकशी करण्याची मागणी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
या सर्व प्रकरणामुळे पुण्यातील जनमानस ढवळून निघाले असून या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे व्हावा अशी मागणी नागरिक करत आहेत. कसब्याचे आमदार आणि पुणे लोकसभेचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी सुरुवातीपासून हे प्रकरण लावून धरले. त्यांनी पोलीसायुक्तालयासमोर आंदोलन केले. त्यांना जनतेचाही मोठा पाठिंबा मिळाला. आता त्यांचे आणि पुणेकरांचे लक्ष या प्रकरणावरून विचलित करण्यासाठी अन्य प्रकरणे पुढे आणली जात असल्याची चर्चा आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये सुमारे पंधरवड्यापूर्वी गांजा सापडला. या प्रकरणी विद्यापीठाने कोणतीही कारवाई केली नाही. या प्रकरणाकडे धंगेकर यांचे लक्ष वेधून त्यांचे लक्ष कल्याणीनगर प्रकरणावरून विचलित करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आता पुण्यात सुरू झाली आहे.
Reviewed by ANN news network
on
५/२९/२०२४ ०१:०२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: