ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना अटक झाल्यावर वैद्यकीय शिक्षण विभागाला जाग; तातडीने चौकशी समिती नेमली
पुणे : कल्याणीनगर पोर्श कार अपघातातील अल्पवयीनाच्या रक्तचाचणीचे अहवाल बदलल्याच्या आरोपावरून पोलिसांनी पुण्यातील ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांना बेड्या ठोकल्यानंतर राज्याचा वैद्यकीय शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे.
या प्रकरणी चौकशीसमिती नेमण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी दिले असून त्यानुसार तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीत ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालये, मुंबईच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे तसेच, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालयाचे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. गजानन चव्हाण आणि छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अति विशेषोपचार रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती आज २८ मे रोजी ससून रुग्णालयात या प्रकरणाची चौकशी करणार असून चौकशी अहवाल वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला देणार आहे.दरम्यान या प्रकरणात डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि अतुल घटकांबळे यांना निलंबित केले जाण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाने ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्याकडून मागविली असल्याचे समजते.
तावरे कोणाला अडकवणार?
दरम्यान डॉ.अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांवर भारतीय दंडविधान कलम १२० ब, ४६७, २०१, २१२, २१३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. अजय तावरे याने पोलिसांवर दबाव आणण्याच्या हेतूने ‘मी शांत बसणार नाही. मी सगळ्यांची नावे घेणार.’ असा इशारा दिला असल्याची चर्चा आहे. तो कोणाची नावे घेणार आणि ते यात अडकणार याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
Reviewed by ANN news network
on
५/२८/२०२४ ११:११:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: