आमदार जितेंद्र आव्हाडांची स्टंटबाजी; मनुस्मृतीचा निषेध करण्याच्या नादात फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो!
महाड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन करण्याच्या नादात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याने आंबेडकरी जनतेत संतापाची लाट उसळली आहे.
महाड येथे क्रांतिस्तंभाजवळ आव्हाड आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केला.याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आंबेडकरी जनतेत संतापाची लाट उसळली असून या प्रकरणी काही कार्यकर्त्यांनी पोलिसात धाव घेतली असल्याचे वृत्त असून आज सायंकाळपर्यंत या प्रकरणी पोलीस कारवाई करण्याची शक्यता असल्याचे समजते.
मागील दोन दिवसांपासून मनुस्मृतीतील श्लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यावरून राजकीय लाथाळ्यांना उत आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने याला आक्षेप घेतला आहे. तर काही संस्था संघटनांनी वयोवृद्ध, ज्येष्ठ यांचा आदर करण्यास सांगणारा हा श्लोक असल्याने त्याचा अभ्यासक्रमात समावेश करण्यास काय हरकत आहे असा सवाल उपस्थित केला आहे. त्यानंतर हा श्लोक वगळण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री केसरकर यांनी दिले.
मात्र, या प्रकरणी निषेध म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आज दुपारी बाराच्या सुमारास या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महाड येथील क्रांतिस्तंभाजवळ मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड आपल्याबरोबर कार्यकर्त्यांचा जत्था घेऊन त्या ठिकाणी पोहोचले. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निषेधाची भाषणे केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांसह मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांनी बाबासाहेबांचा फोटो असलेली पोस्टर्स जाळण्यासाठी फाडली. माध्यमांचे प्रतिनिधी ही घटना घडताना उपस्थित होते. त्यातील काहींनी या घटनेचे शुटींगही केले. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या अंगात संचारलेला उत्साह अचानक मावळला. चूक लक्षात आल्यानंतर घडल्या गोष्टीची माफी मागून या घटनेवर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, यामुळे संतप्त झालेल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पोलिसात धाव घेतली असल्याचे समजते.
Reviewed by ANN news network
on
५/२९/२०२४ ०४:१५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: