निवडणूक प्रचाराची धामधूम आटोपल्यानंतर संपूर्ण देश निकाल काय लागणार याचा अंदाज बांधण्यात व्यग्र असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व कोलाहलापासून अलिप्त होत कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये दोन दिवसांच्या ध्यानधारणेला सुरुवात केली.
मोदी भाजपतर्फे आता तिसर्यांदा पंतप्रधानपदाचा चेहरा आहेत.भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांची युती आणि काँग्रेस व मित्रपक्षांची इंडिया आघाडी यांच्यात यावेळी देशाची सत्ता मिळविण्यासाठी चुरस आहे. भाजपने 'अबकी बार चारसो पार'चा नारा देत ही लढाई आरपारची असल्याचे घोषित केले. तर, भाजपला पायबंद घालण्यासाठी इंडी आघाडीचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अरविंद केजरीवाल, शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांच्यासह अनेकांनी भाजपविरोधात प्रचार करत प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. राहुल गांधी यांनी तर निवडणूक घोषित होण्याआधीच भारत जोडो पदयात्रा काढून भाजप विरोधात देशभरात रान उठविण्याचा प्रयत्न केला.
निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपसाठी सर्वात मोठी गर्दी खेचणारे पंतप्रधान मोदी पक्षाचा प्रचार करण्यासाठी देशभरात फिरले. त्यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी २०६ रॅलींमध्ये भाग घेतला. ८० हून संस्थांशी संवाद साधला. भाजपचे मुख्य रणनीतीकार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १८८ रॅलींना संबोधित केले आणि भारतातील प्रत्येक राज्यात प्रवास केला. पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी २३ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांचा प्रवास केला, जिथे त्यांनी १३४ रॅली आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.
या जोरदार प्रचारपर्वानंतर पंतप्रधान मोदी या कोलाहलापासून अलिप्त होत तमिळनाडूत पोहोचले. गुरुवारी दुपारी त्यांनी प्रथम कन्याकुमारीतील भगवती अम्मान मंदिराला भेट दिली. तेथे, पुजाऱ्यांनी त्यांच्यासाठी एक विशेष आरती केली, आणि त्यांना मंदिरातील प्रसाद म्हणून एक शाल आणि प्रमुख देवतेचे फ्रेम केलेले छायाचित्र दिले. त्यानंतर पंतप्रधान मोदी विवेकानंद रॉक मेमोरिअलपर्यंत नौकेने पोहोचले. हे अत्यंत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले ठिकाण आहे.
अध्यात्मिक साधना सुरू करण्यापूर्वी, मोदी मंडपाकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर उभे राहिले आणि समुद्राच्या विस्तीर्ण भागाकडे टक लावून पाहत होते. विवेकानंद रॉक मेमोरिअल जेथे स्वामी विवेकानंदांना भारतमातेचे दिव्य दर्शन झाल्याचे मानले जाते; तेथे असलेल्या ध्यानमंडपममध्ये मोदी यांनी त्यांचे ध्यान सुरू केले.
मोदींनी अशी ध्यानधारणा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 च्या निवडणूक प्रचारानंतर त्यांनी केदारनाथच्या गुहेत ध्यान केले. आता, तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे त्यांचे उद्दिष्ट असताना, मोदींनी प्रचारानंतरच्या ध्यानधारणेसाठी कन्याकुमारी निवडले आहे.
मोदींच्या ध्यान कालावधीत तामिळनाडू पोलिसांनी संपूर्ण कन्याकुमारी जिल्ह्यात सुरक्षा वाढवली आहे, सुमारे दोन हजार कर्मचारी तैनात केले आहेत. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदल देखील मोदींच्या ध्यानधारणेच्या काळात कडेकोट बंदोबस्त ठेवत आहेत.
तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी स्पष्ट केले की, मोदींची स्मारकाला भेट ही 'खाजगी' भेट आहे. पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झालेले नाहीत.
देशभरात प्रचाराचा कोलाहल शांत झाला असला तरी निकाल काय लागणार याची उत्कंठा सर्वांनाच आहे. एका पक्षाचा पंतप्रधानपदाचा चेहरा असणारे नरेंद्र मोदी मात्र यातून अलिप्त होत ध्यानधारणा करत आहेत. हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य आहे. सर्व गोष्टीपासून असे चटकन अलिप्त होणे सर्वांनाच जमते असे नाही.
Reviewed by ANN news network
on
५/३१/२०२४ १२:५१:०० PM
Rating:

अजून पर्यंत श्री मोदी जी सारखा पंत प्रधान झाला नाही आणि यापुढे होण्याची शक्यता नाही. सर्व भारतीयांनी त्यांच्या कार्याला विरोध न करता सहकार्य केले तर आपला देश पुढे जाईल. अन्यथा स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाच जे चित्र पाहायला मिळालं त्याच्यापेक्षा दारुण दृश्य बघायला मिळेल.
उत्तर द्याहटवा