सेना वैद्यकीय महाविद्यालयाचे दीक्षांत संचलन उत्साहात; ११२ स्नातक सेनादलाच्या वैद्यकीय सेवेत रुजू

 


पुणे : सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५८ व्या तुकडीचे दीक्षांत संचलन २५ एप्रिल रोजी पुणे येथील महाविद्यालयाच्या कॅप्टन देवाशिष शर्मा,कीर्तीचक्र संचलन मैदानावर २५ एप्रिल रोजी पार पडले. या सोहळ्यात ११२ स्नातक सेनादलाच्या वैद्यकीय सेवेत रुजू झाले.

या संचलनास प्रमुख पाहुणे म्हणून सशस्त्र सैन्यदलांच्या वैद्यकीय सेवांचे महासंचालक आणि आर्मी मेडिकल कॉर्प्सचे वरिष्ठ कर्नल कमांडंट लेफ्टनंट दलजित सिंग उपस्थित होते. त्यांनी वैद्यकछात्र सुशीलकुमार सिंह याच्या नेतृत्वाखाली झालेल्या दीक्षांत संचलनाचे निरीक्षण केले.नव्याने सेवेत दाखल झालेल्या अधिकार्‍यांचे अभिनंदन करीत त्यांनी या नव्या अधिकार्‍यांना देशाची आणि सेनेची एकनिष्ठ सेवा करण्याचा संदेश आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५८ व्या तुकडीतील विद्यार्थ्यांनी वैद्यकशिक्षणात अतिशय उत्तम कामगिरी केली. १४७ विद्यार्थ्यांनी पदवी संपादन केली. यामध्ये यामध्ये भारताच्या मित्रदेशांतील ५ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.भारतीय सेनेच्या वैद्यकीय सेवेत दाखल झालेल्या ११२ विद्यार्थ्यांमध्ये ८७ पुरुष आणि २५ महिला आहेत. ११२ मधील ८८ लष्करात, १० नौदलात आणि १४ हवाईदलात दाखल झाले आहेत.

सेनादलात दाखल होण्याचा समारंभ झाल्यानंतर शैक्षणिक पुरस्कार वितरण पार पडले.'राष्ट्रपती सुवर्णपदक' आणि 'कलिंग करंडक' हे या महाविद्यालयाचे सर्वाधिक प्रतिष्ठेचे पुरस्कार आहेत. यावर्षी फ्लाईंग ऑफिसर आयुष जयस्वाल हे 'राष्ट्रपती सुवर्णपदकाचे' तर सर्जन सब लेफ्टनंट बानी कौर या 'कलिंग करंडकाच्या' मानकरी ठरल्या.

या समारंभासाठी वरिष्ठ सेवारत अधिकारी, अनुभवी ज्येष्ठ अधिकारी, प्राध्यापक, वैद्यकीय आणि परिचर्या छात्र यांसह, सेवेत दाखल होणाऱ्या छात्रांचे पालक आणि कुटुंबीय उपस्थित होते.

संचालक आणि कमांडंट लेफ्टनंट जनरल नरेंद्र कोतवाल- एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम,  आणि  एएफएमसीचे अधिष्ठाता आणि डेप्युटी कमांडंट मेजर जनरल गिरीराज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.

देशातील सर्वोत्तम पाच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्थान मिळालेल्या, तसेच गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणासाठी आणि दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी जागतिक पातळीवर नावाजल्या गेलेल्या  एएफएमसीला, देशसेवेची गौरवशाली 75 वर्षे पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ०१ डिसेंबर २०२३ रोजी 'प्रेसिडेंट्स कलर' ने सन्मानित केले होते. तसेच  सैन्यदल प्रमुख जनरल अनिल चौहान, पीव्हीएसएम, युवायएसएम, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम, यांनी १८ मार्च २०२४ या दिवशी एएफएमसीला 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ युनिट प्रशस्तीपत्र' देऊनही गौरवले होते.


सेना वैद्यकीय महाविद्यालयाचे दीक्षांत संचलन उत्साहात; ११२ स्नातक सेनादलाच्या वैद्यकीय सेवेत रुजू सेना वैद्यकीय महाविद्यालयाचे दीक्षांत संचलन उत्साहात; ११२ स्नातक सेनादलाच्या वैद्यकीय सेवेत रुजू Reviewed by ANN news network on ४/२६/२०२४ १०:०५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".