मुंबई : मुंबईतील सायन ट्रॉम्बे रोड, चेंबूर पूर्व येथील डायमंड गार्डन परिसरात दोन अल्पवयीन मुली आणि एका महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्या एका महिलेला २० एप्रिल रोजी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाने अटक केली आहे.
शबनम उर्फ सुजाता हसन शेख, वय ३६ वर्षे असे या महिलेचे नाव आहे. ही महिला गिर्हाईकांना अल्पवयीन मुली आणि महिला पुरवून दलाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीसपथकाने तेथे छापा घातला असता फूस लावून पळवून आणलेल्या दोन अल्पवयीन मुली आणि एका सज्ञान मुलीकडून आरोपी महिला वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. तिच्याविरुद्ध चेम्बूर पोलीसठाण्यात २० एप्रिल रोजी २००/२०२४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ३६६(अ), ३७०(अ) (१), ३७२ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कलम ४,५ आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कलम १६, १७, १८ व जे.जे अॅक्ट कलम ८१, ८७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त, (गुन्हे) लखमी गौतम, अपर आयुक्त (गुन्हे)शशीकुमार मीना, उप-आयुक्त (अंमलबजावणी) श्रीमती रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या निरीक्षक अनिता कदम, शिपाई घाडी, हवालदार जेडगुले, महिला शिपाई दराडे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: