महिलांबाबतच्या विखाराला आवर घाला अन्यथा जनताच पराभवाची धूळ चाखवेल : चित्रा वाघ यांचा काँग्रेसनेत्यांना इशारा
मुंबई : काँग्रेस पक्ष हा राक्षसी शक्तींचे आगर बनला असून काँग्रेस नेत्यांकडून महिलांना वारंवार गलिच्छ भाषेत अपमानित केले जात आहे. महिलांबाबतच्या या विखाराला काँग्रेसने वेळीच आवर घालावा अन्यथा जनताच तुम्हाला तुमची जागा दाखवत पराभवाची धूळ चाटवेल अशी टीका भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.
प्रसिद्धीपत्रकात श्रीमती वाघ यांनी लिहीले की, भारतीय संस्कृतीमध्ये यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः अशा शब्दांत स्त्री शक्तीचा गौरव केला आहे. मात्र त्याच नारीशक्तीचा काँग्रेसकडून वारंवार अपमान होत आहे. काँग्रेसचे खासदार रणदीप सुर्जेवाला यांनी,स्वतःला सभ्य म्हणवणाऱ्या समाजातल्या कुणाही व्यक्तीची मान शरमेनं खाली जावी, इतक्या गलिच्छ भाषेत महिलांना उद्देशून घाणेरडी टिप्पणी केली. त्यांनी आपल्या भाषणात खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनीजी यांच्याबाबत सडकी मुक्ताफळं उधळली होती. पहिल्यांदा अभिनय आणि नंतर राजकीय क्षेत्रात स्वतःला सिद्ध करणाऱ्या हेमा मालिनी यांचाच नव्हे तर स्वकर्तृत्वाने प्रगतीच्या वाटेवरून पुढे निघालेल्या सर्वसामान्य भारतीय स्त्रियांचा हा अपमान आहे असेही त्यांनी पत्रकात म्हटले.
श्रीमती वाघ यांनी म्हटले आहे की खासदार सुर्जेवाला यांची मुक्ताफळे बघा. सुरजेवाला लिहीतात की “आपण आमदार/खासदार कशासाठी बनवतो? जेणेकरून,ते आपला आवाज उठवतील. ही मंडळी कुणी हेमा मालिनी तर नसतात, जिला केवळ चाटण्यासाठी बनवलं जातं.”खासदार महिलेबाबत लिहायची ही कुठली भाषा.एका सहकारी खासदार महिलेचे इतक्या घाणेरड्या शब्दांत वर्णन करायची ही काँग्रेसवाल्यांची कुठली संस्कृती, असा परखड सवाल ही त्यांनी प्रसिद्धीपत्रकातून विचारला.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या महिला नेत्याने भाजपा उमेदवार व अभिनेत्री कंगना राणौत यांच्यावरही अशाच असभ्य शब्दात टिपण्णी केली होती.तसेच काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनी तर नारीशक्ती संपवण्याची भाषा केली होती. यातून काँग्रेस नेते महिला शक्तीकडे कोणत्या दृष्टीतून पाहतात हेच दिसले,असेही वाघ यांनी पत्रकात नमूद केले आहे.
Reviewed by ANN news network
on
४/०४/२०२४ ०९:०८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: