काँग्रेस का हाथ दंगाईयों के साथ : प्रवीण दरेकर
मुंबई : दंगल घडविणे, घातक शस्त्रांचा वापर करणे, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या साजिद खान पठाण याला काँग्रेसने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देऊन ''काँग्रेस का हाथ, दंगाईयों के साथ '' हेच सिद्ध झाले असल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतील गटनेते आ.प्रवीण दरेकर यांनी शनिवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आ.दरेकर बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान हे यावेळी उपस्थित होते. गाजावाजा करत भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून न तुटलेला भारत जोडण्याचे नाटक करणाऱ्या कॉंग्रेसने भारत तोडो ची भाषा करणाऱ्या साजिद खानला उमेदवारी देऊन आपला दुटप्पी चेहरा दाखवला असल्याचेही आ.दरेकर यांनी सांगितले.
आ.दरेकर यांनी यावेळी साजिद खान पठाण याच्याविरुद्ध अकोला शहरातील रामदास पेठ, कोतवाली आणि खदान या तीन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 16 गुन्ह्यांची यादीच वाचून दाखवली. नफरत तोडो नव्हे तर नफरत पसरवणे हाच काँग्रेसचा असली चेहरा आहे अशा शब्दात श्री.दरेकर यांनी काँग्रेसवर शरसंधान साधले. तब्बल 16 गुन्हे दाखल असलेल्या साजिद खान पठाण याला उमेदवारी देऊन काँग्रेसने ‘गुन्हेगार टिकवा आणि गुन्हेगारी वाढवा’ असे धोरण अवलंबले आहे. अकोल्यात झालेल्या दंगलीतील साजिद खान पठाण हा मुख्य आरोपी असून अशा गुन्हेगाराला दिलेल्या उमेदवारीचा भारतीय जनता पार्टी कडवा विरोध करत आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालत काँग्रेस गुन्हेगारांचे उदात्तीकरण करत आहे अशी टीकाही त्यांनी केली. काँग्रेस या दंगेखोराची उमेदवारी मागे घेणार का असा सवालही आ.दरेकर यांनी उपस्थित केला. आ.दरेकर म्हणाले की अशा अट्टल गुन्हेगाराला उमेदवार म्हणून माथी मारत सर्वसामान्य जनतेवर काँग्रेस घोर अन्याय करत आहे. अशा अट्टल गुन्हेगारांना सूज्ञ मतदार त्यांची खरी जागा आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत दाखवून देतील असा विश्वास श्री.दरेकर यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पावर विश्वास ठेवत, जातीपाती व पक्षाच्या पलीकडे जाऊन विकासाच्या मुद्द्यावर जनता आगामी निवडणूक हातात घेणार आहे असेही ते म्हणाले.
Reviewed by ANN news network
on
३/२३/२०२४ ०३:२८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: