डॉ.केशव गिंडे यांचे नवे संशोधन ' स्केल चेंजर पांचजन्य वेणू'

 


पुणे  :  गायनामध्ये साथ संगत करताना 'स्केल चेंजर' हार्मोनियम ने ज्याप्रमाणे स्वर(पट्टी) बदलता येते त्याप्रमाणेच आता बासरी वादकालाही या बासरी या सुषिर वाद्यावर स्वर पट्टी बदलणे शक्य होणार आहे.

 प्रसिद्ध बासरीवादक महामहोपाध्याय डॉ. पंडित केशव गिंडे यांनी आपल्या नवसंशोधित पांचजन्य वेणू ने हे सिद्ध केले आहे.

       संगीत क्षेत्रामध्ये गायनाबरोबरच हार्मोनियम व तंतुवाद्यात विशेषतः सतार, सरोद व वीणा आदी.  वाद्यांमध्ये स्वर(पट्टी) बदलता येणे शक्य असते, परंतु आजपर्यंत बासरी वादनात स्वरांच्या पट्टीतील बदलानुसार  अनेक बासऱ्यांचा वापर करावा लागतो. 

 आता त्यांच्या नवीन संशोधनानुसार,पांचजन्य वेणू या एकाच बासरीवर  (५० हर्ट्स) म्हणजे तीन ते चार पट्ट्यामध्ये बासरी वाजविणे शक्य झाले आहे.

    नवनिर्मित पांचजन्य वेणू (बासरी) मुळे एकाच बासरीवर पांढरी चार, पांढरी तीन, काळी दोन व पांढरी दोन या स्वरांखेरीज अनेक स्वरांमध्ये बासरी वादन करणे सुलभ झाले असून ही बासरी पीव्हीसी पाईप (प्लास्टिक) व कार्बन फायबर अशा दोन घटकांचा उपयोग करून बनवण्यात आली आहे.

   या संशोधनाने बासरी वादकाला आता अनेक बासऱ्यांचा संच जवळ बाळगण्याची आवश्यकता नसून केवळ एकाच बासरीतून तीन ते चार स्वरां (स्केल)पर्यंत बासरी वादन करता येणे शक्य होणार आहे.

   बासरी वादन करताना हवामानाच्या बदलामुळे बासरीच्या स्वरात (पट्टीत) बदल होत असतो, मात्र आता पांचजन्य वेणूच्या निर्मितीत प्लास्टिक, व कार्बन फायबर वापरल्यामुळे  स्वरांच्या (पट्टीत) हवामानाच्या बदलाचा काहीही परिणाम होत नाही. 


 पांचजन्य वेणूची ठळक वैशिष्ट्ये

●ही बासरी एक ते सव्वा मीटर म्हणजे ४० ते ४५ इंच आहे.

● बासरीची निर्मिती पीव्हीसी पाईप व कार्बन फायबर मध्ये करता येते.

त्यामुळे. बांबू वृक्षतोड बंद होवून  पर्यावरणाचा रहास थांबेल.

● पांचजन्य वेणू ही तीन स्वतंत्र विभागात विभागली जात असल्याने बासरी वादकाला १६ इंचाच्या छोट्या सुटसुटीत अशा बासरीच्या पेटीत कार्यक्रमांना घेऊन जाणे सहज शक्य व सुलभ झाले आहे.

● ही बासरी चार सप्तकाची केशव वेणू ,तीन सप्तकातील पन्नालाल घोष वेणू, दोन सप्तकात वाजणारी पारंपारिक बासरी अशा तीनही बासरींचे एकत्रीकरणाने तयार झालेली आहे.

●बासरी वादनामधील एकसुरीपणा जावून ठुमरी,टप्पा यासाठी विविध स्वरांच्या वेणुंचा  आविष्कार या केवळ एकाच  वेणुवर केल्यामुळे बासरी वादनात विविधता व रंगत येईल.


पांचजन्य वेणू विषयी प्रसिद्ध बासरी वादकांच्या प्रतिक्रिया:-

प्रसिद्ध बासरी वादक पंडित राजेंद्र प्रसन्ना ( दिल्ली) पंचजन्य वेणू विषयी  म्हणाले की " गेल्या हजारो वर्षापासून चालत आलेल्या परंपरागत श्रीकृष्णाच्या बासरीवर आजपर्यंत असा अद्भुत प्रयोग झाला नव्हता, माझे मित्र केशव गिंडे यांच्या संशोधनाचा विचार अत्यंत क्रांतिकारी आहे. माझे वडील व काका अनेक वर्षे बासरी निर्मितीच्या क्षेत्रात होते परंतु अशा प्रकारची चार स्वरां (स्केल)मध्ये वाजणारी एकच बासरी प्रत्यक्षात उतरवणे अशक्यप्राय आहे, हे अद्भुत संशोधन गिंडे यांनी करून दाखविले आहे. या बासरीची प्रचिती येण्यासाठी मलाही अशी बासरी भेट द्यावी ही विनंती करतो."

प्रसिद्ध बासरी वादक पं. नित्यानंद हळदीपूर  पांचजन्य वेणू विषयी म्हणाले की ,"केशव गिंडे प्रसिद्ध बासरीवादक व माझे गुरुबंधू असून ते इंजिनियर असल्याने त्यांनी अत्यंत कल्पकतेने पांचजन्य वेणूची निर्मिती केली आहे. या बासरीची खासियत अशी आहे की चार  वेगवेगळ्या बासऱ्यांच्या ऐवजी एकच बासरीवर चार वेगवेगळ्या स्वरात(स्केल) मध्ये पुढे मागे सरकवून अत्यंत सुरेल बासरी वादन करता येते, हे संशोधन स्टुडिओ मधील बासरीवादन  करताना  बासरी वादकाला अत्यंत उपयुक्त राहील"

   महामहोपाध्याय पं. केशव गिंडे यांनी १९८४ साली केशव वेणू बासरीचे निर्मिती केली आहे, केशव वेणू ही लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स R&D विभाग व गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये गौरवलेली आहे.  तसेच माधव वेणू, केशव नामवेणू, चैतन्य वेणू एक इंच लांब व अनाहत वेणू बारा फूट लांब आदी. अनेक नवीन बासऱ्यांची निर्मिती केली असून या सर्व बासऱ्यांचे वादन त्यांच्या शिष्यां समावेत विविध कार्यक्रमातून केले जाते.

डॉ.केशव गिंडे यांचे नवे संशोधन ' स्केल चेंजर पांचजन्य वेणू' डॉ.केशव गिंडे यांचे नवे संशोधन ' स्केल चेंजर पांचजन्य वेणू' Reviewed by ANN news network on ३/०४/२०२४ ०३:२७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".