आज मराठा आरक्षणासाठी निगडीतील तहसील कार्यालयावर मोर्चा; शहरातील पुढा-यांचे आरक्षणाच्या मुद्द्यावर मौन!
पिंपरी : मराठा आरक्षणासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज २ नोव्हेंबर रोजी निगडीतील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
सकाळी ११ वाजता आकुर्डीतील खंडोबा माळापासून मोर्चा सुरू होणार आहे.यावेळी कोणाताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातून जाणाऱ्या महामार्गांवर पोलिसांनी गस्त वाढविली आहे. आंदोलक रस्त्यांवर टायर जाळत असल्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून पोलिसांनी रस्त्यावर पडलेले तसेच गॅरेजसमोर ठेवलेले टायर देखील जप्त केले आहेत.
आंदोलकांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करावे. कायदा हातात घेऊ नये असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी कालच प्रसिद्धीपत्रक काढून आंदोलन अहिंसक पद्धतीने करण्याचे आवाहन केले आहे.
शहरातील पुढा-यांचे आरक्षणाच्या मुद्द्यावर मौन!
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर इतरत्र रणकंदन माजले असताना भाजपचे एकनाथ पवार वगळता पिंपरी चिंचवड शहरातील आमदार, खासदार, विविध पक्षांचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक मौन बाळगून आहेत. याबद्दल मराठा समाजात नाराजी आहे. या सर्वांनी वेळीच भूमिका न घेतल्यास त्याचा परिणाम त्यांना येत्या निवडणुकीत भोगावा लागण्याची शक्यता आहे.
Reviewed by ANN news network
on
११/०२/२०२३ ११:३६:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: