पहाटे शिक्षणासाठी निघालेल्या तरुणीचा पाठलाग करत झाडीमध्ये खेचून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; संशयिताच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या


मुलुंड, मुंबई (१६ ऑगस्ट २०२६): मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिक्षणासाठी जात असलेल्या एका तरुणीचा पाठलाग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ३१ वर्षीय आरोपीला पोलिसांनी कौशल्याने सापळा रचून अटक केली आहे. अनिल रामचरण करोतिया (वय ३१ वर्षे, रा. वाल्मिक नवयुवक सुधारक समिती, सी. पी. तलाव परिसर, वागळे इस्टेट, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ७४, ७६, ७९, ११५(२), ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नेमकी घटना काय घडली?

६ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास पीडित तरुणी शिक्षणासाठी आपल्या घरून निघाली होती. मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका रस्त्यावरून जात असताना एका अज्ञात तरुणाने तिचा पाठलाग सुरू केला. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीजवळ पोहोचताच या इसमाने तरुणीला जबरदस्तीने झाडीत ओढले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने प्रसंगावधान राखत आरोपीचा प्रतिकार केला व त्यांच्यात जबर झटापट झाली. या झटापटीदरम्यान तरुणीला दुखापत झाली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी पीडितेने धाव घेऊन दिलेल्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला.

६ तपास पथके आणि २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे विश्लेषण

घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ ६ विशेष तपास पथके तयार करण्यात आली. घटनास्थळ आणि त्याच्या सभोवतालच्या परिसरातील २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तब्बल १२० तासांचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. तांत्रिक तपास, गुन्हेगारी अभिलेखांची पडताळणी आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास चक्रांना गती देण्यात आली.

तपासादरम्यान असे दिसून आले की, एक संशयित पहाटेच्या वेळी गुन्ह्याच्या आधी आणि गुन्ह्यानंतरच्या दिवशी घटनास्थळाच्या परिसरात मोटारसायकलवरून फिरत होता. १४ ऑगस्ट २०२६ रोजी तपास पथकाला घटनास्थळ परिसरात पुन्हा एकदा हाच तरूण संशयित हालचाली करताना आढळला. तो मोटारसायकलवरून निघून गेल्यानंतर त्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मागोवा घेण्यात आला. गोपनीय माहितीनुसार त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, उपलब्ध पुराव्यांवरून त्याचा या गुन्ह्याशी थेट संबंध असल्याचे निष्पन्न झाले, त्यानंतर त्याला औपचारिकरीत्या अटक करण्यात आली.

महिला आणि तरुणींसाठी पोलिसांचे आवाहन

या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक मायादेवी कालगावे करत आहेत. तपासादरम्यान आरोपी यापूर्वीही या घटनास्थळ परिसरात वारंवार येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या व्यक्तीकडून अशाच प्रकारचा त्रास, छेडछाड किंवा लैंगिक स्वरूपाचा गैरप्रकार झाला असल्यास संबंधित महिला अथवा तरुणींनी न घाबरता निर्भयपणे मुलुंड पोलीस ठाणे किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अशा तक्रारींची त्वरित दखल घेऊन आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल आणि तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

तपास पथकाची कामगिरी

ही कामगिरी पोलीस आयुक्त बृहन्मुंबई देवेन भारती,सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) डॉ. मनोज कुमार शर्मा, अप्पर आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) धनंजय कुलकर्णी, उप आयुक्त (पूर्व परिमंडळ-३) अभयसिंग देशमुख, सहाय्यक आयुक्त (मुलुंड विभाग) सुदर्शन होनवडजकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तसेच मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या नेतृत्वात निरीक्षक नितीन खाडगे, मायादेवी कालगावे, सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय भोसले, मनोज पाटील, उप निरीक्षक स्वप्निल महाजन, विक्रम टाकमोघे, विकास चव्हाण, सागर नाळे तसेच पूर्व परिमंडळ-३ अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथक व गुंड पथकातील अंमलदार किरण चव्हाण, हेमंत शेडगे, राजेश चौगुले, रणजित माळी, संदीप परदेशी, अशोक भोर, अशोक खराडे, निलेश भोईर, शरद माळी, प्रशांत बामणे, साहेबराव सोनकांबळे, गणेश पाटील, राजेंद्र ठाकूर, विष्णू आव्हाड, देवीदास डोंगरे, विवेक शिंपी, सागर गावडे, भिमराव तरडे, महेश सरकटे यांनी ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.


  • Labels: Mulund Police, Crime News Mumbai, Women Safety, BNS 2023, Mumbai Police Action, CCTV Investigation, Criminal Arrest

  • Search Description: Mulund police arrested 31-year-old Anil Karotiya for attempting sexual assault on a college girl. Police scanned 250 CCTV footage over 120 hours to nab the accused.

  • Hashtags: #MulundPolice #MumbaiCrime #WomenSafety #MumbaiPolice #CrimeNews #JusticeForWomen #BNS2023

पहाटे शिक्षणासाठी निघालेल्या तरुणीचा पाठलाग करत झाडीमध्ये खेचून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; संशयिताच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या पहाटे शिक्षणासाठी निघालेल्या तरुणीचा पाठलाग करत झाडीमध्ये खेचून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; संशयिताच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या Reviewed by ANN news network on ८/१८/२०२६ ११:३९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".