नागपूर : नागपुरात सध्या अतिवृष्टी होत आहे. अवघ्या चार तासात शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून अंबाझरी तलाव ओव्हरफ़्लो झाल्यामुळे शहराच्या काही भागात पाणी शिरले आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या बोलावण्यात आल्या असून त्यांनी मदत कार्याला सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस स्थानिक प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देश त्यांनी दिले. धोकादायक घरे आणि नदीकाठच्या वस्तीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी तात्काळ हलविण्याच्या सूचना दिल्या. तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे, त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. पाण्याची पातळी वाढल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्यांची मदत घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नागपुरात आलेल्या एसडीआरएफच्या 2 तुकड्या 7 गटात विभागण्यात आल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे. आतापर्यंत 140 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. मूकोबधीर विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. नागपूर शहराच्या विविध भागात 2 एनडीआरएफ चमू बचाव कार्यात आहेत. अग्निशमनदल सुद्धा मदतकार्य करत आहे. अंबाझरी परिसरात लष्कराच्या 2 तुकड्या पोहोचत आहेत. शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. वृद्ध नागरिकांना सर्व ती मदत तातडीने द्या, असे निर्देशसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
Reviewed by ANN news network
on
९/२३/२०२३ ०४:०६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: