मुंबई : महाराष्ट्र विधानसभेतील विरोधीपक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी लाईव्ह ऑनलाईन घेण्यात यावी अशी मागणी केली आहे.
२२ सप्टेंबर रोजी वडेट्टीवार यांनी हे पत्र नार्वेकर यांना पाठवले आहे. या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या बंडखोरी प्रकरणी आमदारांच्या अपात्रते संदर्भात आपल्याकडे सुरू असलेल्या कार्यवाहीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकशाही आणि न्यायप्रेमी जनतेचे लक्ष लागले आहे. या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील अनेक महत्वपूर्ण निष्कर्ष नोंदवून आपण या प्रकरणी न्यायनिवाडा करावा असे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने बंडखोर आमदारांवर नेमकी काय कारवाई होणार हे देखील महाराष्ट्राला कळणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील राजकारणाच्या ढासळत्या दर्जामुळे राज्यातील नागरिकांमध्ये एकंदर राजकीय व्यवस्थेबाबत नकारात्मकता निर्माण झाली असून हे लोकशाहीच्या हिताचे नाही. माननीय विधानसभा अध्यक्ष या नात्याने आपण एका संवैधनिक पदावर विराजमान असून या प्रकरणाबाबत आपण कसा न्याय देणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे या पार्श्वभूमीवर संवैधानिक संस्था, संवैधनिक पदे आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे आपण ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण करावे. आमदार अपात्र प्रकरणाची ही सुनावणी पारदर्शक व्हावी म्हणून ही सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण करावे, ही विधानसभेचे विरोधी पक्षनेता म्हणून माझी मागणी आहे.
Reviewed by ANN news network
on
९/२४/२०२३ ०२:४२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: