पिंपरी : तळेगाव दाभाडे येथील जनविकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या १२ मे रोजी झाली होती. या प्रकरणातील सूत्रधार तळेगाव नगर परिषदेतील माजी नगरसेवक चंद्रभान उर्फ़ भानू विश्वनाथ खळदे याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडविरोधी पथकाने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रभान खळदे याच्यावर १९९२ साली एक खुनाचा आणि २००६ साली एक दंगल, हाणामारीचा गुन्हा दाखल आहे. शिवाय आवारे खून प्रकरणात आता मुख्य आरोपी म्हणूनही त्याचे नाव आले आहे.
आवारे खून प्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच शाम अरुण निगडीकर, प्रविण ऊर्फ रघुनाथ संभाजी धोत्रे, आदेश विठठल धोत्रे सर्व राहणार तळेगाव दाभाडे व संदीप ऊर्फ नन्या विठठल मोरे रा. आकुर्डी, पुणे यांच्यासह चंद्रभान खळदे याचा मुलगा गौरव खळदे यांना अटक केली आहे. त्याने आवारे यांच्या हत्येची सुपारी वरील तिघांना दिली होती. तपासामध्ये पोलिसांना या हत्येचा कट चंद्रभान खळदे याने रचल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केल्याचा सुगावा लागताच आरोपी चंद्रभान खळदे हा आपला मोबाईल बंद करून पसार झाला होता. तो सुमारे १५ वर्षे नगरसेवक असल्याने त्याच्याबद्दल माहिती देण्यास कोणीही धजावत नव्हते.
गुंडविरोधी पथकाच्या पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचे मोबाईल ट्रेस करून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावरून आरोपी प्रथम खंडाळा त्यानंतर यवत येथे होता. त्यानंतर त्याने हैदराबाद गाठले व शेवटी तो नाशिक येथील सिंधी कॉलनी येथे रहात असल्याचे पोलिसांना समजले. गुंडविरोधी पथकाच्या पोलिसांनी तातडीने नाशिक येथे जाऊन त्याला ताब्यात घेत तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: