पिंपरी : जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात भागीदार असलेल्या व्यक्तीची हत्या करण्याचा कट रचणा-या एका सीएला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली असून या प्रकरणात मारेकरी आणि सीए यांच्यातील दुवा असणा-या त्याच्या मैत्रिणीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
विवेक नंदकिशोर लाहोटी, वय ४२ वर्षे, सनदी लेखपाल, व्यवसाय रा ए १/२, एच.डी.एफ. सी. कॉलनी, शाहुनगर, चिंचवड, पुणे असे या सीएचे नाव आहे. त्याने आपल्या मैत्रिणीच्या माध्यमातून सुधीर परदेशी आणि शरद साळवी या दोघांना आपला जमीन खरेदी विक्री व्यवसायातील भागीदार राजू माळी राहणार सोमाटणे फाटा, मावळ, पुणे याच्या खुनाची सुपारी दिली होती. माळी याला ठार मारल्यास त्यांना ५० लाख रुपये देण्याचे त्याने कबूल केले होते.
तळेगाव दाभाडे येथे झालेल्या किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रचलेल्या खुनाच्या कटाचा तपास सुरु असताना दरोडा विरोधी पथकाला मिळालेल्या बातमीवरुन सोमाटणे फाट्याजवळ दि.०३ जुलै रोजी सुधीर अनिल परदेशी, वय २५ वर्षे, राहणार फ्लॅट नं २०३ साई धाम सोसायटी, केशवनगर, वडगाव, ता मावळ, जि पुणे याला ०२ गावठी पिस्तुले व १६ जिवंत काडतुसे यासह ताब्यात घेण्यात आले. त्याने ही शरद साळवी याच्यामार्फ़त मध्यप्रदेशातून ३ गावठी पिस्तुले आणि ४० काडतुसे आणल्याची कबुली दिली. यापैकी एक पिस्तूल सीए विवेक लाहोटी याच्याकडे ठेवल्याची कबुली दिली.
या दोन सराईत गुन्हेगारांचा सीएसारखा प्रतिष्ठित व्यवसाय करणा-या व्यक्तीशी काय संबंध असा प्रश्न पोलिसांना पडाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पोलीसकोठडीत घेऊन सखोल तपास केला असता. लाहोटी याने माळी यांच्या खुनाची सुपारी त्याच्या मैत्रिणीच्या माध्यमातून दिल्याची कबुली दोन्ही आरोपींनी दिली. माळी दर शनिवार आणि रविवारी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या बांधकाम साईटला भेट देतात. तेथेच मुक्काम करतात. तेथे त्यांची हत्या केल्यास कोणाला संशय येणार नाही असे आरोपींना वाटले होते. त्यामुळे आरोपींनी तेथे जाऊन पाहणीही केली होती. मात्र, परदेशी याच्या अटकेमुळे हा कट उघडकीस आला. सीए विवेक लाहोटी याच्यासह त्याच्या मैत्रिणीलाही पोलिसांनी अटक केली आहे.
ही कामगिरी दरोडा विरोधी पथकाचे निरीक्षक जितेंद्र कदम, सहायक निरीक्षक अंबरीश देशमुख, अंमलदार आशिष बनकर, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, गणेश हिंगे, गणेश सावंत, विनोद वीर, समिर रासकर, सुमित देवकर, महेश खांडे, सागर शेडगे, उमेश पुलगम, प्रविण माने, राजेश कौशल्य, राहुल खारगे, नितीन लोखंडे, चिंतामण सुपे व अमर कदम यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: