पिंपरी : रुपीनगर, चिखली येथे ६ जुलै रोजी दुपारी एका वृद्ध महिलेचा खून झाला होता. या प्रकरणाचा उलगडा करण्यात पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा, युनिट १ च्या पथकाला यश आले आहे. हा खून त्या महिलेच्या शेजारीच राहणा-या अल्पवयीन मुलाने केला असल्याची धक्कादायक बाब तपासात आढळून आली आहे.
६ जुलै रोजी दुपारी रुपीनगर चिखली येथील राजमाता जिजाऊ सोसायटीमध्ये शोभा आमटे या महिलेचा डोक्यात अवजड वस्तूने प्रहार करून खून करण्यात आला होता. चिखली पोलीसठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा, युनिट १ करत होते. या पथकाने सीसीटीव्ही फ़ुटेज, तांत्रिक विश्लेषण करून या प्रकरणाचा उलगडा केला. या मुलाच्या वडिलांसमक्ष चौकशी केली असता त्याने लोखंदी बत्ता डोक्यात घालून त्या वृद्धेचा खून केल्याची कबुली दिली.
या मुलाचे वडील आणि मृत महिलेचा मुलगा हे मित्र आणि जवळच राहणारे आहेत. हा मुलगा काही दिवसांपूर्वी मृत महिलेच्या घरात गेला होता. त्यावेळी तिने त्याला धक्काबुक्की करून घराबाहेर काढले होते. या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने डोक्यात लोखंडी बत्त्याने प्रहार करून शोभा आमटे यांचा खून केला असल्याची कबुली त्याने दिली.
हा तपास वरिष्ठ निरीक्षक संतोष पाटील, अंमलदार शिवाजी कानडे, बाळासाहेब कोकाटे, महादेव जावळे, सोमनाथ बोऱ्हाडे, मनोजकुमार कमले, फारुक मुल्ला, अमित खानविलकर, गणेश महाडिक, सचिन मोरे,प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, अजित रूपनवर, प्रमोद गर्जे, मारोती जायभाये, स्वप्नील महाले, तानाजी पानसरे यांनी केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: